scorecardresearch

खून करून भिकारी झाला, स्वतःच्या कारने भीक मागायला जायचा, ३ वर्ष पोलिसांना चकमा, ‘असा’ अडकला जाळ्यात

दिल्लीतल्या एका खूनाच्या प्रकरणातील आरोपीने भिकारी बनून पोलिसांना चकमा दिला. हा भिकारी वेगवेगळ्या सिग्नलवर स्वतःच्या कारने जायचा आणि तिथे जाऊन भिक मागायचा.

Ghaziabad murderer become beggar
दिल्लीत खून केल्यानंतर हा आरोपी गाझियाबादमध्ये जाऊन लपला होता. (Indian Express Photo)

खूनाच्या प्रकरणातील एका आरोपीने पोलिसांना तब्बल ३ वर्ष चकमा दिला. पोलिसांपासून लपण्यासाठी तो भिकारी बनून राहिला. पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी गाझियाबादमधल्या रस्त्यावर एका दिव्यांगासोबत भीक मागत होता. पोलिसांना ३ वर्ष चकमा देणाऱ्या या आरोपीचं नाव शहजाद असं असून तो ३३ वर्षांचा आहे. तर ज्या दिव्यांग व्यक्तीसोबत तो भीक मागत होता त्याचं नाव फूल हसन असं आहे. ट्रॅफिक सिग्नलवर कार थांबल्यावर लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी तो कुबड्यांवर चालणाऱ्या हसनचा वापर करायचा. त्यानंतर दिवसभर भीक मागून मिळालेले पैसे हे दोघेजण वाटून घ्यायचे.

शहजादची ही चाल फार दिवस चालली नाही. अखेर पोलीस शहजादपर्यंत पोहोचले. शहजादने २०१९ मध्ये वायव्य दिल्लीतल्या जहांगिरपुरीमध्ये एका व्यक्तीची गोळी घालून हत्या केली होती. त्याचा साथीदार असलेल्या वकिलाला काही महिन्यांनंतर अटक करण्यात आली, शहजादला फरार आरोपी घोषित करण्यात आले.

हत्येनंतर गाझियाबादमध्ये जाऊन कुटुंबासोबत राहू लागला

एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं की, शहजाद सातत्याने त्याचं राहण्याचं ठिकाण बदलत राहिला. प्रत्येक वेळी तो वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लपायचा. त्यानंतर आमच्या तपास पथकाला माहिती मिळाली की तो त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत गाझियाबाद येथे राहत आहे. त्याच्या घरात त्याची पत्नी, ६० वर्षांचे वडील यांच्यासह तो गाझियाबादमधल्या गंगा विहार येथे स्थायिक झाला आहे. तीन वर्ष पोलीस त्याच्या मागावर होते. पोलिसांना माहिती मिळाली की त्याच्याकडे एक सँट्रो कारदेखील आहे. या कारने तो सर्वत्र फिरत राहिला.

हे ही वाचा >> Vacation Mode On! राहुल गांधी सुट्टीवर, गुलमर्गमध्ये लुटला स्की स्लोपचा आनंद, पाहा Video

शेजाऱ्यांनी सांगितलं की शहजाद कारनेच ये-जा करायचा

एका अधिकाऱ्याने सांगितलं की, शहजादच्या घराची माहिती मिळताच आम्ही त्याचे शेजारी आणि घरमालकाकडे चौकशी केली. त्यांनी सांगितलं की, शहजाद सकाळी त्याच्या कारने घराबाहेर पडायचा आणि संध्याकाळी परत यायचा. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरांचं फुटेज तपासलं. तेव्हा समजलं की, शहजाद त्याची कार घेऊन गाझियाबादमधल्या वेगवेगळ्या ट्रॅफिक सिग्नलवर जायचा.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-02-2023 at 13:27 IST
ताज्या बातम्या