Allahabad High Court ruling on polygamy in Islam: बहुपत्नीत्वाचे एक प्रकरण अलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणीसाठी आले असताना त्यावर न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी समोर आली आहे. मुस्लीम व्यक्ती एकाहून अधिक पत्नी करू शकतो, पण त्याला सर्व पत्नींना समान वागणूक द्यावी लागेल, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे. मुरादाबाद येथील फुरकान नावाच्या व्यक्तीविरोधात दाखल झालेल्या बलात्कार प्रकरणाची सुनावणी दरम्यान न्यायाधीश अरुण कुमार सिंह देसवल यांच्या एकलपीठाने वरील टिप्पणी केली.

बार अँड बेंचच्या वृत्तातील माहितीनुसार, न्यायाधीशांनी म्हटले की, कुराणमध्ये विशिष्ट परिस्थितीत बहुपत्नीत्वाचा अधिकार दिलेला आहे. पण काही लोकांकडून त्याचा स्वार्थी हेतूने गैरवापर केला जातो.

अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले की, भारतीय संविधानाच्या कलम २५ मध्ये प्रत्येक व्यक्तीला त्याच्या धार्मिक श्रद्धेनुसार धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे. ज्यामध्ये त्याच्या धार्मिक श्रद्धेनुसार बाह्य कृत्येही समाविष्ट आहेत. परंतु हे धार्मिक स्वातंत्र्य सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता आणि आरोग्य या विषयांच्या आड येऊ शकत नाही. एकलपीठाने असेही नमूद केले की, इतिहासात इस्लाम समुदायातील विधवांचे आणि अनाथ बालकांचे रक्षण करण्यासाठी बहुपत्नीत्वाची पद्धत रुढ झाली होती.

एकलपीठाने पुढे म्हटले की, इतिहासात असा एक काळ होता जेव्हा अरबांच्या आदिम टोळ्यांमध्ये संघर्ष होत होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात महिला विधवा आणि त्यांचे मुले अनाथ होत असत. मदिनामध्ये नव्याने स्थापन झालेल्या इस्लामिक समुदायाचे रक्षण करताना मुस्लिमांना अडचणींचा सामना करावा लागत होता. अशा परिस्थतीत विधवा आणि अनाथ मुलांचे शोषण रोखण्यासाठी कुराणने बहुपत्नीत्वाची मोकळीक दिली.

अलाहाबाद उच्च न्यायालयातील प्रकरण काय?

फुरकान यांच्या विरोधात त्यांच्या पत्नीने बलात्काराची तक्रार दाखल केली होती. आधीचे लग्न लपवून फुरकानने आपल्याशी लग्न रचले, असा आरोप पीडितेने केला. तसेच लग्नानंतर बलात्कार झाल्याचाही दावा करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी फुरकान आणि इतर दोघांविरोधात नोटीस सादर केली.

पीडित महिलेने सांगितले की, माझ्याशी लग्न करताना फुरकानचे आधीच लग्न झालेले आहे, हे माझ्यापासून लपविले गेले. आरोपीची बाजू मांडत असताना त्याच्या वकिलाने सांगितले की, मुस्लीम वैयक्तिक कायद्यानुसार पती चार महिलांशी लग्न करू शकतो. यावर न्यायालयाने म्हटले की, सदर व्यक्तीचा विवाह वैध असल्यामुळे त्याच्याविरोधात बलात्कार आणि बहुपत्नित्वाचा आरोप दाखल होऊ शकत नाही. तसेच या प्रकरणाची पुढील चौकशी करून तक्रारदारालाही नोटीस पाठविली.

दरम्यान फुरकान आणि इतर आरोपींविरुद्ध कोणतीही बळजबरीची कारवाई करण्यात येऊ नये, असेही आदेश देण्यात आले आहेत.