Muslim woman accuses doctor of refusing treatment in UP video goes viral : उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे एका मुस्लिम महिलेने जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरने धार्मिक कारण देत उपचार करण्यास नकार दिल्याचा आरोप केला आहे. यानंतर वादाला तोंड फुटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना या महिन्याच्या सुरुवातीला घडली होती. त्यानंतर डॉक्टर महिलेला उपचार नाकारत असल्याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रुग्णालय प्रशासनाने हे आरोप फेटाळून लावले आहेत, मात्र व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये मात्र वेगळाच प्रकार समोर आला आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, मुख्य वैद्यकीय अधिक्षक (CMS) डॉ, महेंद्र गुप्ता यांनी सांगितले की बिरिबारी गावातील एक महिला शमा परवीन यांना ३० सप्टेंबर रोडी प्रसुतीसाठी जिल्हा महिला रुग्णालयात रात्री साडेनऊच्या सुमारास आणण्यात आले होते. त्या रात्री कामावर असलेल्या एका महिला डॉक्टरने त्या महिलेची तपासणी केली असेही त्यांनी सांगितले.

मात्र १ ऑक्टोबर रोजी समोर आलेल्या व्हिडिओमध्ये शमा परवीन यांनी आरोप केला आहे की, ड्युटीवर असलेल्या डॉक्टरने त्यांना सांगितले, “मी मुस्लिम महिलेवर उपचार करणार नाही. मी तुमची डिलिव्हरी करणार नाही.” तसेच डॉक्टरने नर्सला त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये न घेऊन जाण्यास सांगितले आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्यांना दुसर्‍या रुग्णालयात घेऊन जा असेही सांगितले. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सीएमएसनी डॉक्टरांना बोलावून त्यांना जाब विचारत स्पष्टीकरण देण्यास सांगितले.

“डॉक्टरने धर्मावर आधारित असे कोणतेही विधान केल्याचे नाकारले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे,” असेही त्यांनी पीटीआयली सांगितले.

दरम्यान पोलिसांनी दोन स्थानिक पत्रकारांविरोधात एफआयआर दाखल केला असून मयंक श्रीवास्तव आणि मोहम्मद उस्मान अशी दोघांची नावे आहेत. ज्यांनी कथितरित्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला.

रुग्णालयाने दाखल केलेल्या तक्रारीनुसार , दोन पत्रकार बळजबरीने लेबर रुममध्ये घुसले आणि व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि त्यांनी रुग्णालयाच्या मालमत्तेचेही नुकसान केले. दरम्यान या घटनेवरून भारतीय जनता पक्ष आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप होताना पाहयला मिळत आहेत.