भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना करण्यात सहभागी असल्याच्या वृत्ताचा पाकिस्तानने इन्कार केला असतानाच संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी पाकवर टीकास्त्र सोडले आहे. पाकिस्तानच्या दाव्यात विश्वासार्हता नसून पाक सैन्याच्या पाठिंब्या किंवा सहभागाशिवाय असे कृत्य होऊ शकत नाही असे जेटलींनी म्हटले आहे.
सोमवारी जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील कृष्णाघाटी क्षेत्रात पाकिस्तानी सैन्याने भारताच्या हद्दीत घुसून दोन भारतीय जवानांना ठार केले होते. यानंतर पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना केल्याचा नृशंस प्रकार समोर आला होता. मात्र इस्लामाबादमधील पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळून लावले होते. जवानांच्या मृतदेहांची विटंबना करण्यात सहभाग नसल्याचे पाकिस्तानने म्हटले होते. यावर बुधवारी अरुण जेटलींनी प्रतिक्रिया दिली. पाकिस्तानने वृत्ताचा इन्कार केला असला तरी त्यांच्या दाव्यात विश्वासार्हता नाही. पाक सैन्याच्या पाठिंब्याशिवाय अशी घटना घडू शकत नाही असे जेटलींनी नमूद केले. भारत काय कारवाई करणार या प्रश्नावर जेटली म्हणाले, भारतीय सैन्यावर प्रत्येकाने विश्वास ठेवावा.
पत्रकार परिषदेत अरुण जेटलींनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची माहितीदेखील दिली. विजयवाडामधील विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देण्यास मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला. तसेच सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींमधील सुधारणांनाही केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. याशिवाय भरतपूर, गुवाहाटी आणि भोपाळमधील अशोका हॉटेल्समधील भागीदारीमधून केंद्र सरकार बाहेर पडण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
बुधवारी दुपारी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकला खडेबोल सुनावले होते. कृष्णा घाटी सेक्टरमध्ये शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या मृतदेहांवर आणि घटनास्थळी सापडलेल्या रक्ताच्या नमुन्यांवरून हल्लेखोर पुन्हा सीमारेषेपलीकडे पळून गेल्याचे सिद्ध होते असे भारताने म्हटले होते. पाक सैनिकांनी कृष्णा घाटी सेक्टरमधील भारतीय हद्दीत प्रवेश केल्याचे ठोस पुरावे आमच्याकडे असल्याचे भारताने पाकला सुनावले होते.