muzaffarnagar police fined helmetless Rs 1 lakh scooter rider Rs 21 Lakh : एका स्कूटर चालकाला हेल्मेट न घातल्यामुळे जवळपास २१ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचा थक्क करणारा प्रकार समोर आला आहे. विशेष बाब म्हणजे हा व्यक्ती चालवत असलेल्या स्कूटरची किंमत ही एक लाख इतकी आहे. या चलानचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दुचाकी चालकाला २०७४००० रुपये इतका दंड ठोठावण्यात आल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी नंतर या प्रकरणात स्पष्टीकरण देखील दिले आहे.

ही घटना गेल्या मंगळवारी उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यात घडली. येथे न्यू मंडी परिसरात तपासणी सुरू असताना अमोल सिंघल याला वाहतूक पोलिसांकडून थांबवण्यात आले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, त्यावेळी त्याने हेल्मेट घातले नव्हते. तसेच, त्याच्याकडे आवश्यक कागदपत्रेही नव्हती.

पोलिसांनी त्याची स्कूटर जप्त केली आणि त्याला २०७४००० रुपयांचा दंड ठोठावला. ही रक्कम पाहून चालकाला चांगलाच धक्का बसला आणि त्याने याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. यामुळे पोलिसांचे चांगलेच हसू झाले आणि त्यांनी नंतर ही रक्कम कमी करून फक्त ४ हजार इतकी केली.

पोलिसांनी काय सांगितलं?

मुझफ्फरनगरचे पोलीस अधीक्षक (वाहतूक) अतुल चौबे यांनी सांगितले की, दंड ठोठावणाऱ्या उपनिरीक्षकाच्या चुकीमुळे हा प्रकार घडला. ते म्हणाले, “त्या प्रकरणात मोटार वाहन कायद्याचे कलम २०७ लागू केले गेले होते. परंतु, उपनिरीक्षक २०७ नंतर ‘एमव्ही ॲक्ट’चा उल्लेख करायला विसरले.” यामुळे, ‘२०७’ आणि या कलमांतर्गत असलेली किमान दंडाची रक्कम ४,००० रुपये हे एकत्र होऊन रक्कम २०७४००० इतकी मोठी झाली. तसेच चौबे यांनी स्पष्ट केले की त्या व्यक्तीला फक्त ४००० रुपये इतकाच दंड भरावा लागेल.

एमव्ही कायद्याच्या कलम २०७ अनुसार आवश्यक कागदपत्रे नसल्यास पोलिसांना वाहने जप्त करण्याचा अधिकार मिळतो.