मुझफ्फरनगर हिंसाचारप्रकरणी राज्य पोलिसांनी थंड भूमिका घेतल्याचा आरोप अत्यंत गंभीर असून त्यासंदर्भात खुलासा करावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी उत्तर प्रदेश सरकारला दिला. राजकीय दबावापोटीच पोलिसांनी जातीय िहसाचार आटोक्यात आणण्याकामी पोलिसांनी थंड भूमिका घेतली, असा आरोप करण्यात आला होता.
केवळ राजकीय दबावापोटीच पोलिसांनी मुझफ्फरनगरमधील हिंसाचार आटोक्यात आणण्याकामी खंबीर घेतली नसल्याचे एका वृत्तवाहिनीवरून दाखविण्यात आले होते. या मुद्दय़ाची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने अखिलेश यादव सरकारला नोटीस धाडली आहे.
अत्यंत गंभीर आरोप
 ‘हे आरोप अत्यंत गंभीर असून आम्ही त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. राज्य सरकारने यावर आपले मतप्रदर्शन केले पाहिजे, असे सरन्यायाधीश पी. सत्यशिवम् यांनी सांगितले. राज्य सरकारने यावर येत्या १७ ऑक्टोबपर्यंत आपले उत्तर द्यावे, असेही आदेशात म्हटले आहे.