उत्तर प्रदेशात मुझफ्फरनगर जिल्ह्यातील जातीय दंगलप्रकरणी आज (शनिवार) आणखी दोन आमदारांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आमदारांमध्ये भाजपचे संगीत सिंग सोम आणि बसप चे नूर सलीम राणा यांचा समावेश आहे. संगीत सोम यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्यापूर्वी शुक्रवारी भाजपचे आमदार सुरेश राणा यांना अटक करण्यात आली होती.
मुझफ्फरनगरच्या महापंचायतीमध्ये भडकाऊ भाषण करणारे व बनावटी व्हिडीओद्वारे दंगल भडकविण्याचा आरोप असलेले भाजपचे आमदार संगीत सोम यांनी आज पोलिसांपुढे शरणागती पत्करली. तर मुस्लिम समुदायाला भडकवणारे बसपाचे आमदार नूर सलीम राणा यांना अटक करण्यात आली आहे.
आपल्यावर लावण्यात आलेले आरोप निराधार असल्याचे सांगत संगीत सोम म्हणाले की, मी कोणताही व्हिडीओ युट्यूब किंवा वेससाइटवर टाकलेला नाही. तसेच, मी सीडी चेही वाटप केले नसून मुझफ्फरनगर येथे प्रक्षोभक भाषण केलेले नाही.