भारतात वेगाने बदल घडवण्याची गरज व्यक्त करतानाच हे बदल घडवण्यासाठी देशातले कायदे आणि अनावश्यक प्रणाली बदलण्याची गरज आहे, असे परखड मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडले. भारताला खरंच झपाट्याने विकास करायचा असेल तर मंदगतीने बदल घडवून काहीच उपयोग होणार नाही, असेही ते म्हणाले.
मोदी यांनी शुक्रवारी नीती आयोगातर्फे आयोजित ‘ट्रान्सफॉर्मिंग इंडिया’ या विषयावर संबोधित केले. मोदींच्या भाषणावेळी संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ उपस्थित होते. देशात मंदगतीने बदल करण्याऐवजी झपाट्याने सुधारणा घडवण्याकडे कल असला पाहिजे, असे मोदींनी सांगितले. १९ व्या शतकातील प्रशासकीय पद्धतीच्या आधारे आपण २१ व्या शतकात बदल घडवू शकत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. प्रशासकीय कामात बदल करण्यासाठी मानसिकतेमध्ये बदल करावे लागतात आणि परिवर्तनकारी विचारधारा असल्याखेरीज मानसिकता बदलता येत नाही असेही त्यांनी नमूद केले.
प्रत्येक देशाचा स्वतःचा अनुभव, क्षमता आणि साधनसंपत्ती असते. आता देश एकमेकांवर अवलंबून असतात. वेगळे राहून कोणत्याही देशाला विकास करणे कठीण जाईल असे मोदी म्हणाले. सध्याची युवा पिढी इतकी वैचारिक आणि महत्त्वाकांक्षी झाली आहे की आता कोणत्याही सरकारला भूतकाळात रमून चालणार नाही असे मोदींनी सांगितले.

पुस्तक आणि लेख वाचून आपल्याला नवनवीन कल्पना मिळू शकतील. जोपर्यंत आपण सर्व एकत्र येऊन चर्चा करत नाही तोपर्यंत हे विचार एका व्यक्तीपर्यंतच मर्यादित राहतील, असे मोदींनी सांगितले. विविधता असलेल्या देशाने लोकशाही, एकता आणि अखंडता याचे रक्षण केले आहे. ही छोटी गोष्ट नाही, असे गौरवोद्गारही त्यांनी काढलेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: My vision for india is rapid transformation says narendra modi
First published on: 26-08-2016 at 18:57 IST