चांद्रयान ३ मोहिम यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (२६ ऑगस्ट) इस्रोच्या वैज्ञानिकांची भेट घेतली. भल्या सकाळी झालेल्या भेटीदरम्यान त्यांनी वैज्ञानिकाशी संवाद साधला असून त्यांचं मनपूर्वक अभिनंदनही केलं आहे. हे मानवतेचं यश असून यामुळे आपलं मिशन ज्या क्षेत्राला एक्स्प्लोर करले, तिथे सर्व देशांच्या मून मिशनसाठी नवे रस्ते निर्माण करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसंच, ज्या जागेवर मून लँडिंग झालं आहे, त्या जागेचं नामकरणही करण्यात आल्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

“स्पेस मिशनच्या टच डाऊन पाँईंटला एक नाव देण्याची वैज्ञानिक परंपरा आहे. चंद्राच्या ज्या भागावर आपलं चांद्रयान उतरलं आहे, भारताने त्या जागेच्या नामकरणाचा निर्णय घेतला आहे. ज्या जागेवर चांद्रयान ३ चं मून लँडर उतरलं आहे, त्या पाँईटला शिवशक्तीच्या नावाने ओळखलं जाईल”, अशी मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

हेही वाचा >> चांद्रयान ३ मोहिमेच्या यशानिमित्त २३ ऑगस्टला साजरा करणार खास दिन, मोदींकडून ‘या’ दिनाची घोषणा

शिवशक्ती नावाच अर्थ काय?

“शिवमध्ये मानवतेच्या कल्याणाचा संकल्प आहे आणि शक्तीपासून त्या संकल्पांना पूर्ण करण्यासाठी सामर्थ्य मिळते. चंद्रावरील शिवशक्ती पाँइंट हिमालयापासून ते कन्याकुमारी जोडल्याचा बोध करत आहे”, असं मोदी म्हणाले.

“ज्या मनाने आपण कर्तव्य कर्म करतो, विचार आणि विज्ञानाला गती देतो आणि जे सर्वांमध्ये उपस्थित आहे, ते मन शुभ आणि कल्याणकारी संकल्पाशी जोडलेले राहावे. मनाच्या या शुभ संकल्पांशी जोडले राहण्यासाठी शक्तीचा आशिर्वाद अनिवार्य आहे. ही शक्ती आपली नारी शक्ती आहे”, असंही मोदी म्हणाले.

चांद्रयान २ ज्या ठिकाणी उतरले त्या जागेचंही नामकरण

“आणखी एक नामकरण गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. चार वर्षांपूर्वी चांद्रयान २ चंद्रापर्यंत पोहोचलं होतं, तेव्हा प्रस्ताव होता की त्या जागेचं नाव ठरवलं जाईल, पण त्यावेळी आम्ही ठरवलं होतं की जेव्हा चांद्रयान ३ यशस्वीरित्या चंद्रावर पोहोचेल तेव्हा आम्ही दोन्ही पाँईंटचं नाव एकत्र ठेवू. आज मला वाटतं की जेव्हा हरघर तिरंगा, हर मन तिरंगा आणि चंद्रावरही तिरंगा आहे, तर तिरंगाशिवाय चांद्रयान २ शी संबंधित त्या जागेला दुसरं काय नाव देता येऊ शकतं? त्यामुळे चांद्रयान २ ने जिथे आपली पावलं ठेवली आहेत ती जागा आता तिरंगा या नावाने ओळखली जाणार आहे”, असं मोदी म्हणाले.

“हा तिरंगा पाँइंट आपल्याला शिकवण देईल की कोणतंही अपयश शेवटचं नसतं. जर दृढ इच्छाशक्ती असेल तर यश प्राप्त होतंच. म्हणजेच, चांद्रयान २ चे पदचिन्ह आहे ती जागा तिरंगा नावाने ओळखली जाईल. तर, ज्या ठिकाणी चांद्रयान ३ चे मून लँडर पोहोचलं आहे ती जागा आजपासून शिवशक्ती पाँइंट म्हणून ओळखले जाणार आहे”, असा पुनरूच्चार मोदींनी केला.

हेही वाचा >> PHOTOS : “विक्रमचा विश्वास आणि प्रज्ञानचा पराक्रम”, वैज्ञानिकांसाठी मोदींचे प्रेरणादायी भाषण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संपूर्ण पिढी जागृत झाली

“भारताची युवा पिढी तंत्रज्ञान, विज्ञानाने भारलेली आहे. त्यामागे आपल्या अशाच स्पेस मिशनचं यश आहे. मंगलायानचे यश, चांद्रयान मोहिमेचे यश, गगनयानामुळे देशाच्या युवा पिढीला नवा उत्साह मिळाला आहे. प्रत्येकाच्या तोंडी आज चांद्रयानाचे नाव आहे. भारतातील प्रत्येक लहान मूल वैज्ञानिकांमध्ये आपलं भविष्य पाहत आहे. त्यामुळे तुम्ही (वैज्ञानिकांनी) फक्त चंद्रावर तिरंगा फडकवला नसून तुम्ही एक मोठं यश प्राप्त केलं आहे, ज्यामुळे भारताची संपूर्ण पिढी जागृत झाली आहे, त्यांना नवी ऊर्जा मिळाली आहे. तुम्ही पूर्ण पिढीवर आपल्या यशाचा ठसा उमटवला आहे”, असं मोदी म्हणाले. “आज तुम्ही भारतीय मुलांमध्ये आकांक्षाचे बिज रोवले आहे, ते उद्या वटवृक्ष बनणार आहे”, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.