पीटीआय, मंगलदोई (आसाम)
“काँग्रेस पक्ष भारतीय लष्कराला पाठिंबा देण्याऐवजी पाकिस्तानने प्रशिक्षण देऊन तयार केलेल्या दहशतवाद्यांना पाठिंबा देतो,” असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केला. आसामच्या दरांग जिल्ह्यातील मंगलदोई येथे आयोजित कार्यक्रमात भाषण करताना, पंतप्रधानांनी काँग्रेसवर घुसखोर व देशविरोधी शक्तींचे संरक्षण करत असल्याचा आरोप केला.
आसाममध्ये पुढील वर्षाच्या सुरुवातीला विधानसभा निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले होते. पंतप्रधानांनी आपल्या भाषणांमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’, आसाममधील घुसखोरी, लोकसंख्येचे स्वरूप बदलण्याचा कथित प्रयत्न, दिवंगत गायक भूपेन हजारिका यांचा काँग्रेसकडून कथित अपमान, विकास इत्यादी मुद्दे समाविष्ट केले. कामाख्यादेवीच्या कृपेने ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी झाले अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
“भाजप घुसघोरांना जमीन बळकावू देणार नाही आणि लोकसंख्येचे स्वरूप बदलण्याचे कारस्थान रचू देणार नाही,” असे मोदी म्हणाले. मुख्यमंत्री हिमांता बिस्वा सरमा हे घुसखोरांना हुसकावून लावत आहेत आणि त्यांनी अतिक्रमणात बळकावलेली जागा शेतकऱ्यांना कसण्यासाठी देत आहेत, अशी प्रशंसा पंतप्रधानांनी केली. घुसखोरीचे आव्हान पाहता देशभरात लोकसांख्यिकी मोहीम राबवली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
मोदी यांनी १९६२च्या चिनी आक्रमणाबद्दल टिप्पणी करत प्रथम पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना पुन्हा एकदा लक्ष्य केले. काँग्रेसची आसामवर अनेक दशके सत्ता होती, पण त्यांनी ब्रह्मपुत्रा नदीवर तीनच पूल बांधले, तर भाजपने गेल्या १० वर्षांमध्ये सहा पूल बांधले असे ते म्हणाले. आसामच्या विकासाचा दर १३ टक्के असून ईशान्य भारत विकसित भारताच्या स्वप्नात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे मोदींनी सांगितले.
१२,३०० कोटींचे प्रकल्प
पंतप्रधान मोदी यांनी आसाममध्ये विविध ठिकाणी एकूण १२,३०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. हा शून्य कचरा निर्मिती करणारा प्रकल्प असून या प्रकल्पाचा ५० हजारांपेक्षा जास्त लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष फायदा होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांनी गोलघाट जिल्ह्यातील नुमलीगढ येथे ५,००० कोटींच्या बांबूआधारित इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन केले. तसेच त्यांनी नुमलीगढ रिफायनरी येथे ७,२३० कोटींच्या पेट्रो फ्लुइडाइज्ड कॅटॅलिक क्रॅकर युनिटची पायाभरणी केली.
‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या पायाभूत सुविधा नष्ट करणाऱ्या आपल्या सैन्याला पाठिंबा देण्याऐवजी, काँग्रेस घुसखोर आणि देशविरोधी शक्तींचे संरक्षण करत होती.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान