भारतातील बदलत्या राजकारणाचा वेध घेत अमेरिकेनेही लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर केलेल्या सर्वेक्षणात ६३ टक्के भारतीयांनी भाजपच्या बाजूने कौल दिल्याचे म्हटले आहे. तर काँग्रेसला १९ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. याशिवाय पंतप्रधानपदासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यापेक्षा गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी अधिक लोकप्रिय असल्याचेही या सर्वेक्षणातून समोर आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून जगभरातील नजरा भारताकडे लागल्या आहेत. अमेरिकेने आतापासूनच भारतातील बदलत्या राजकारणाचा वेध घेत आपली पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेतही तेथील भारतीयांची मते जाणून घेणारे सर्वेक्षण पीईडब्लू रिसर्च सेंटरच्या वतीने करण्यात आले. यासाठी ७ डिसेंबर २०१३ ते १२ जानेवारी २०१४ या काळात भारतीयांची मोठी वस्ती असणाऱ्या भागातील सुमारे दोन हजार ४६४ लोकांची मते जाणून घेण्यात आली. त्यामध्ये २९ टक्के लोकांनी सध्या भारताची सुरू असलेली वाटचाल योग्य दिशेने असल्याचे म्हटले आहे तर तब्बल ७० टक्के लोकांनी विद्यमान परिस्थितीबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
या जनमत चाचणीत  ६३ टक्के लोकांनी भारतातील पुढील सरकार भाजपचे असावे असे म्हटले आहे तर १९ टक्के लोकांनी अजूनही काँग्रेसवर विश्वास दाखवला आहे. भविष्यात रोजगारनिर्मिती करण्याबाबत भाजप अधिक यशस्वी होईल, असे मानणाऱ्यांची संख्या ५८ टक्के आहे तर काँग्रेसला २० टक्के लोकांनी कौल दिला आहे.