मोदी सरकारच्या बाहूत बळ..

न्यायासाठी पहिले पाऊल

पंतप्रधान नरेंद्र मोदी (संग्रहित छायाचित्र)

कुलभूषण जाधवप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये पाकिस्तानला सणसणीत चपराक देण्यामध्ये भारताला यश आल्याने तिसऱ्या वर्धापन दिनाच्या तयारीत असलेल्या नरेंद्र मोदी सरकारची छाती आणखीनच फुगली. पण त्याच वेळी नव्या कुरापती काढल्याशिवाय पाक गप्प बसणार नसल्याची खात्री असल्याने अतिसावधानता बाळगावी लागण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

एका अर्थाने काश्मीर प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयीकरण होण्याचा धोका स्वीकारून कुलभूषण जाधव यांना वाचविण्यासाठी थेट आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा धाडसी निर्णय मोदी सरकारने घेतला होता. निकाल विरोधात गेला असता तर आणखी तीव्र टीकेला सामोरे जाण्याचा धोका होता.

तसेच अगोदरच काश्मीरमधील परिस्थिती हाताळण्याचे दडपण असताना जाधव प्रकरणातील प्रतिकूल निर्णयाचा विपरीत परिणाम काश्मीरमधील तणावग्रस्त परिस्थितीवर झाला असता.

सुदैवाने निकाल भारताच्या बाजूने लागल्याने मोदी सरकारवरील दडपण कमी झाले आणि दुसरीकडे पाकची कोंडी आणि नाचक्की झाली. त्यामुळे २६ मे रोजी सरकारचा तिसरा वर्धापनदिन साजरा करण्याच्या तयारीत असलेल्या मोदी सरकारचे व भाजपचे बाहू चांगलेच फुरफुरणार आहेत.

तरीही भीती या कुरापतींची..

सणसणीत चपराक बसल्यानंतर गप्प बसण्याऐवजी पाक आणखी कुरापती काढण्याची शक्यता अनेकांना वाटते आहे. त्यापकी भीती पुढील काही शक्यतांची..

  • आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाला केराची टोपली दाखवून जाधव यांना फाशीवर चढविण्याचा टोकाचा निर्णय पाक घेऊ शकतो. यापूर्वीच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या तीनही निकालांना धाब्यावर बसवून अमेरिकेने फाशी दाखले आहेत. पण इतके टोक गाठण्याचा धोका पाक कितपत स्वीकारेल? तसे केल्यास राष्ट्रसंघाकडून आíथक र्निबध आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी प्रतिमाहनन होईल.
  • या निकालाविरोधात राष्ट्रसंघाची सुरक्षा परिषद आणि नंतर सर्वसाधारण सभेचे दरवाजे पाक ठोठावू शकते. पण आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा अंतिम निर्णयास बराच काळ अपेक्षित आहे.
  • काहींच्या मते, पाक तुरुंगामध्ये कैद्यांमध्ये हाणामारी घडवून कुलभूषण जाधव यांची हत्या घडवून आणण्याचाही कट रचला जाऊ शकतो.
  • आंतरराष्ट्रीय दबावामुळे फाशी देता आली नाही तर पाककडून जाधव यांचा कोठडीमध्ये अनन्वित छळ केला जाण्याची भीती बहुतेकांना वाटते.
  • याशिवाय सीमेवरील कुरापती वाढविणे, आणखी दहशतवाद्यांना घुसविण्यासारख्या कारवायांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

न्यायासाठी पहिले पाऊल

दरम्यान, न्यायालयाने पाकला दिलेली सणसणीत चपराक ही जाधव यांना न्याय मिळवून देण्यासाठी पहिले पाऊल असल्याची प्रतिक्रिया परराष्ट्र मंत्रालयाने दिली. मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले म्हणाले, ’हा निकाल अत्यंत स्पष्ट आणि पूर्णपणे एकमताने दिला आहे. अंतिम निकाल येईपर्यंत जाधव सुरक्षित राहू शकतात. कारण हा आदेश पाकवर बंधनकारक आहे आणि त्याचे उल्लंघन केल्यास आंतरराष्ट्रीय र्निबधांना त्यांना सामोरे जावे लागेल.’

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Narendra modi marathi articles

ताज्या बातम्या