प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख येणार असं नरेंद्र मोदी बोललेच नव्हते – देवेंद्र फडणवीस

‘तुम्ही कोणतीही व्हिडिओ क्लीप किंवा संकल्पपत्र काढून बघा’

प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख येणार असं पंतप्रधान नरेंद्र मोदी बोललेच नव्हते असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तुम्ही कोणतीही व्हिडिओ क्लीप किंवा संकल्पपत्र काढून बघा असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. एबीपी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं. तुम्ही कोणतीही व्हिडीओ क्लिप, पत्र, घोषणापत्र काढून बघा मोदींनी कधीच प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख येणार असं सांगितलेलं नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरनाम्यावर प्रतीक्रिया देताना संवेदनशील पंतप्रधान आणि संवेदनशील पक्षाने समाजाची आवश्यकता लक्षात घेऊन तयार केलेलं संवेदनशील संकल्पपत्र असल्याचं सांगितल. देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसने जाहीर केलेल्या न्याय योजनेवरही टीका केली. ‘राहुल गांधींच्या योजनेला कोणीही गांभीर्याने घेतलेलं नाही. निवडणुका आल्यावर घोषणा करायच्या आणि त्यांची अंमलबजावणी करायची नाही हा काँग्रेसचा इतिहास आहे. आपली योजना राबवणार कशी हे राहुल गांधी सांगू शकलेले नाहीत’, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

काँग्रेसला आपण निवडून येणार नाही हे माहिती आहे, त्यामुळे ते प्रत्येक गरिबाला ताजमहाल बांधून देऊ, प्रत्येकाच्या घरी ओढा तयार करुन देऊ असं आश्वासन देऊ शकतात असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. आम्ही जबाबदार पक्ष आहोत. आम्ही सत्तेत येणारच आहोत. त्यामुळे एखादा संकल्प जाहीर करताना त्याची तरतूद करावीच लागेल असंही त्यांनी सांगितलं.

भाजपाच्या संकल्पपत्रात राम मंदिराच्या पुनरुच्चार करण्यात आला असून देवेंद्र फडणवीस यांनी राम मंदिर हा आस्थेचा प्रश्न, राम मंदिराच्या बाजूनेच सुप्रीम कोर्टात निकाल लागेल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंवर टीका करताना राज ठाकरे पूर्णपणे फ्रस्ट्रेटेड, मनसे आता उनसे झाली, म्हणजे उमेदवार नसलेली सेना असा टोला लगावला.

राष्ट्रवादीने गेल्या पाच वर्षात विष पेरण्याचा प्रयत्न केला असा आरोप यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केला. मराठा समाजा मोर्चानंतर कोणी हिंसा पसरवली ? सोशल मीडियावर हिंसा कोणी भडकवली ? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. मुख्यमंत्री ब्राह्मण हे वारंवार जनतेच्या मनावर ठसवलं, तर द्वेष निर्माण होईल असं शरद पवारांना वाटतं असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Narendra modi never said 15 lakh will be deposit in account says devendra fadanvis

ताज्या बातम्या