पीटीआय, समस्तीपूर, बेगुसराय

बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला विक्रमी विजय मिळेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी व्यक्त केला. राज्यात प्रचाराला सुरुवात करताना मोदी यांनी समस्तीपूर आणि बेगुसराय जिल्ह्यांमध्ये प्रचारसभा घेतल्या. “राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस या विरोधी पक्षांचे नेते जामिनावर बाहेर आहेत,” अशी टीका करत जनतेने त्यांना सत्तेपासून दूर ठेवावे असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

समस्तीपूर येथील सभेला ‘रालोआ’च्या सर्व घटक पक्षांचे नेते उपस्थित होते. “थोड्या कालावधीसाठी राजदबरोबर सरकार स्थापन करणे ही चूक होती,” असे मुख्यमंत्री नितीशकुमार आपल्या भाषणात म्हणाले. ‘रालोआ’ ही निवडणूक विद्यमान मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली लढवत आहे, याचा पुनरुच्चार मोदी यांनी केला. गुजरात, मध्य प्रदेश आणि हरियाणाप्रमाणेच महाराष्ट्रातही भाजपला आघाडी सरकारची सत्ता कायम राखण्यात यश आले आहे, ही बाब त्यांनी अधोरेखित केली.

भाजपप्रणित ‘रालोआ’ एकसंध आहे, मात्र ‘इंडिया’ आघाडीमध्ये अजूनही मतभेद आहेत, अशी टीका त्यांनी केली. ‘रालोआ’मध्ये भाजपसह संयुक्त जनता दल, लोक जनशक्ती पक्ष आणि हिंदुस्तानी अवाम मोर्चा या पक्षांसह राष्ट्रीय लोकमोर्चाचा समावेश आहे. आमची आघाडी विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आहे असे मोदी म्हणाले.

तरुण मतदारांना आवाहन करताना पंतप्रधान म्हणाले की, “ऑक्टोबर २००५मध्ये तुमच्या पालकांनी ‘जंगलराज’ संपुष्टात आणले होते. आता बरोबर २० वर्षांनी सुशासनाच्या बाजूने मतदान करून समृद्धीला चालना देणे ही तुमच्या खांद्यावरील मोठी जबाबदारी आहे.” गेल्या ११ वर्षांच्या कालखंडामध्ये ‘यूपीए’ सरकारच्या तुलनेत ‘रालोआ’ सरकारने बिहारला अधिक मदत केली, असेही त्यांनी सांगितले.

नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्रीपदी नाही; तेजस्वी

बिहारमध्ये ‘रालोआ’ पुन्हा सत्तेत आल्यास नितीशकुमार यांना पुन्हा मुख्यमंत्री केले जाणार नाही, असा दावा ‘राजद’चे नेते तेजस्वी यादव यांनी शुक्रवारी केला. राज्यात गेल्या २० वर्षांपासून ‘जदयू’प्रणित ‘रालोआ’ची सत्ता असूनही बिहार अजूनही गरीब राज्य आहे, अशी टीका तेजस्वी यांनी सहरसा जिल्ह्यातील सिम्री बख्तियारपूर येथे जाहीर सभेत बोलताना केली. “भाजपने नितीशकुमार यांचे अपहरण केले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे गुजराती नेते बिहारवर नियंत्रण ठेवत आहेत,” अशी टीका त्यांनी केली. तसेच राज्यातील भ्रष्ट नेते आणि गुन्हेगारांना केंद्राकडून अभय दिले जात असल्याचा आरोपही तेजस्वी यांनी केला. ‘महागठबंधन’ सत्तेत आल्यास स्वच्छ सरकार देऊ, जनतेची गाऱ्हाणी ऐकू आणि त्यांना नोकऱ्या व परवडणाऱ्या दरांमध्ये औषधे उपलब्धू करून देऊ असे आश्वासनही यादव यांनी दिले.

‘खरी दिवाळी १४ नोव्हेंबरला’

 बिहारमध्ये १४ नोव्हेंबरला ‘राजद’चा अपमानास्पद पराभव होईल आणि त्या दिवशी खरी दिवाळी साजरी होईल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सिवान जिल्ह्यातील प्रचारसभेत बोलताना व्यक्त केला. बिहारमध्ये ‘इंडिया’ आघाडी पूर्णपणे खिळखिळी झाली आहे, असा दावा शहा यांनी केला. बिहारमध्ये ६ आणि ११ नोव्हेंबर या दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार असून १४ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे.

राजद, काँग्रेस तुमच्या समस्या सोडवतील अशी अपेक्षा ठेवू नका. ते स्वतःच मोठी समस्या आहेत. ते जनतेप्रति असंवेदनशील आहेत. ते पूरग्रस्तांची थट्टा करतात. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान