व्हॉर्टोन बिझनेस स्कूलमध्ये होत असलेल्या आर्थिक परिसंवादामध्ये आयोजित करण्यात आलेले गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे बीजभाषण रद्द करण्यात आल्यानंतर आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांना परिसंवादामध्ये भाग घेण्यासाठी निमंत्रित करण्यात आल्याची चर्चा मंगळवारी राजधानीतील राजकीय वर्तुळात होती. मात्र, खुद्द केजरीवाल यांनी मोदींना पर्याय म्हणून आपल्याला निमंत्रित करण्यात आल्याचा दावा फेटाळला. आयोजकांनी खूप दिवसांपूर्वी माझ्याशी संपर्क साधून मला परिसंवादामध्ये भाषण करण्याचे निमंत्रण दिले होते. त्यामुळे मोदी यांचे भाषण रद्द होण्याचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
येत्या २३ मार्चला होणाऱया परिसंवादामधील मोदींचे भाषण रद्द करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला. व्हॉर्टोनमधील काही प्राध्यापक, विद्यार्थी संघटनांबरोबरच पेन्सिल्वानिया विद्यापीठाच्या भारतीय-अमेरिकन प्राध्यापकांनी केलेल्या जोरदार विरोधामुळे मोदींचे भाषण रद्द करण्यात आले.
केजरीवाल म्हणाले, परिसंवादात सहभागी होण्यासाठी आयोजकांनी अनेक वक्त्यांना बोलावले आहे. त्यापैकी मीदेखील एक आहे. त्यामुळे मोदींचे भाषण रद्द होण्याचा आणि मला निमंत्रित करण्याचा काहीही संबंध नाही. मला आयोजकांनी १५-२० दिवसांपूर्वीच परिसंवादासाठी निमंत्रित केले होते.