Narendra Modi on India’s Biggest Enemy in the World : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (२० सप्टेंबर) गुजरातमधील भावनगर येथे आयोजित एका रोड शोमध्ये सहभागी झाले होते. यावेळी मोदी यांनी ३४,२०० कोटी रुपयांच्या विकासकामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन केलं. त्यानंतर मोदी यांनी एका जाहीर सभेला संबोधित केलं. यावेळी मोदी म्हणाले, “या जगात आपला कोणीही शत्रू नाही. भारताचा कोणी शत्रू असेल तर तो म्हणजे इतर देशांवरील आपलं अवलंबित्व. आपण आत्मनिर्भर (स्वावलंबी) झालो तर या शत्रूवर आपण सहज मात करू शकतो.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भारत आज विश्वबंधूच्या भावनेने मार्गक्रमण करत पुढे जात आहे. या जगात आपला कोणीही मोठा शत्रू नाही. खऱ्या अर्थाने आपला कोणी मोठा शत्रू असेल तर तो म्हणजे आपलं दुसऱ्या देशावरील अवलंबित्व. तोच आपला सर्वात मोठा शत्रू आहे. आपण सर्वांनी मिळून भारताच्या या शत्रूला पराभूत करुया. दुसऱ्या देशावरील अवलंबित्व नावाच्या या शत्रूला आपण पराभूत केलंच पाहिजे. कुठल्याही स्थिती आपल्याला त्यावर मात करावी लागेल.
…तर आपल्या देशाचा आत्मसन्मान दुखावला जाईल : मोदी
मोदी म्हणाले, “आपण दुसऱ्या देशावर अवलंबून राहून चालणार नाही. आपण इतर देशांवर जितके अवलंबून राहू तितकी आपली अधोगती होत राहील आणि ते आपलं खूप मोठं अपयश असेल. जगभरात शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी जगात सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या या आपल्या देशाला स्वावलंबी व्हावंच लागेल. आपण दुसऱ्या देशांचे आश्रित बनून राहिलो तर आपला आत्मसन्मान दुखावेल. १४० कोटी लोकसंखेच्या या देशाचं भविष्य आपण दुसऱ्या देशांच्या हाती सोपवू शकत नाही.
शंभर आजारांवर एकच औषध
“आपण देशाच्या विकासाचा संकल्प केला आहे. हा सकंल्प आपण दुसऱ्या देशांवर सोडू शकत नाही. आपण दुसऱ्या देशांवर अवलंबून राहून विकासाचा संकल्प पूर्ण करू शकत नाही. आपण आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य इतरांच्या, इतर देशांच्या हाती सोपवू शकत नाही. त्यांचं भविष्य पणाला लावू शकत नाही. त्यामुळे मी सांगतोय ते लक्षात घ्या, शंभर आजारांवर एकच औषध आहे, ते म्हणजे स्वावलंबन. आपण जितके स्वावलंबी होऊ तितकेच पुढे जाऊ.”
पंतप्रधान म्हणाले, “आपल्या सरकारने देशातील नागरिकांनी एक छान भेट दिली आहे. जीएसटीमध्ये (वस्तू व सेवा कर) मोठ्या प्रमाणात कपात करून आपल्या दैनंदिन गरजेच्या वस्तूंसह वाहनांपर्यंतच्या असंख्य गोष्टी स्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे आपण आगामी सण मोठ्या उत्साहात साजरे करू शकू.”