वाराणसी, पीटीआय
‘‘संस्कृतीमध्ये एकात्मता विकसित करण्याची उपजत क्षमता असते. या पार्श्वभूमीवर ‘जी-२०’ राष्ट्रगटातील देशांच्या सांस्कृतिक मंत्र्यांचे कार्य अवघ्या मानवतेसाठी खूप महत्त्वाचे आहे,’’ असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी व्यक्त केले. वाराणसीत होत असलेल्या ‘जी-२०’च्या सांस्कृतिक मंत्र्यांच्या बैठकीस उपस्थित प्रतिनिधींनी पूर्वमुद्रित ध्वनिचित्रफितीद्वारे मोदींनी हा संदेश दिला.
मोदी म्हणाले, की वाराणसी हे अध्यात्म, ज्ञान आणि सत्याचा खजिना आहे. संस्कृतीत एकत्र येण्याची अंतर्भूत शक्ती आहे. संपूर्ण मानवजातीसाठी तुमचे कार्य खूप महत्वाचे आहे. दिल्लीतील पंतप्रधान संग्रहालय भारताचा लोकशाही वारसा प्रतिबिंबित करते. आर्थिक विकासासाठी, विविधतेसाठी वारसा-परंपरा महत्त्वाचा पाया आहे. वारसा जपत विकास साधणे, हे भारताच्या वाटचालीचे सूत्र आहे. भारत आपला सांस्कृतिक वारसा अधिक प्रभावीरीत्या जतन करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करत आहे.
सुमारे नऊ मिनिटांच्या ध्वनिचित्रफीत संदेशाद्वारे पंतप्रधानांनी या बैठकीत सहभागी विविध देशांचे सांस्कृतिक मंत्री आणि इतर प्रतिनिधींना शुभेच्छा दिल्या. मोदींचाचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसी येथे २४-२५ ऑगस्टदरम्यान जी-२० संस्कृती कृतिगटाची (सीडब्ल्यूजी) चौथी आणि अंतिम बैठक आयोजित केली होती. २३ ऑगस्टपासून प्रतिनिधी शहरात येण्यास सुरुवात झाली आणि गंगा नदीचे रस्ते आणि घाट यानिमित्ताने खास सजवण्यात आले. सांस्कृतिक मंत्र्यांच्या बैठकीनंतर ‘सीडब्ल्यूजी’ची सांगता होते.
पंतप्रधान मोदींच्या संदेशानंतर केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांनी आपले विचार मांडले. तत्पूर्वी, जूनमध्ये गोव्यात झालेल्या ‘जी-२०’च्या पर्यटन मंत्र्यांच्या बैठकीच्या उद्घाटन सत्रादरम्यान पंतप्रधानांनी ध्वनिचित्रफीत संदेशाद्वारे २०२४ च्या लोकसभा निवडणुकांदरम्यान इतर देशांच्या प्रतिनिधींना वैविध्याने नटलेला लोकशाहीचा उत्सव पाहण्यासाठी भारताला भेट देण्याचे आवाहन केले होते.