अमेरिकेच्या अंतराळवीरांनी चंद्रावर पहिले मानवी पाऊल ठेवले असले तरी आता नजीकच्या काळात तरी चंद्रावर समानव अंतराळ मोहीम पाठवण्याची शक्यता नासा (नॅशनल अ‍ॅरोनेटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) या संस्थेने फेटाळून लावली आहे.
नासाचे प्रमुख चार्ल्स बोल्डन यांनी सांगितले, की नजीकच्या काळात अमेरिका अंतराळवीरांना चंद्रावर पाठवणार नाही. चंद्रावर पुन्हा लगेच माणूस पाठवण्याचा आमचा विचार नाही. त्याउलट लघुग्रहावर मानवाला पाठवण्यावर तसेच मंगळावर माणूस पाठवण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल.
अवकाश अभ्यास मंडळ व अंतराळ अभियांत्रिकी मंडळ यांची बैठक गेल्या आठवडय़ात वॉशिंग्टन येथे झाली त्या वेळी बोल्डन यांनी सांगितले, की नासा आता नजीकच्या काळात चंद्रावर माणूस पाठवणार नाही. निदान माझ्या कारकीर्दीत तरी नाही, कारण त्याशिवाय करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. त्याऐवजी मंगळ व लघुग्रहांवर माणूस पाठवला जाईल.
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी २०१० मध्ये केनेडी स्पेस सेंटर येथे केलेल्या भाषणात असे जाहीर केले होते, की २०२५पर्यंत लघुग्रहावर माणूस पाठवण्याची मोहीम राबवली जाईल.
अमेरिकेचे नील आर्मस्ट्राँग व बझ आल्ड्रिन यांनी २० जुलै १९६९ रोजी प्रथम चंद्रावर पाऊल ठेवले होते. त्यानंतर १९७२पर्यंत पाच चांद्रमोहिमा यशस्वी झाल्या व अपोलो-१७ मोहिमेनंतर चांद्रमोहिमा थांबवण्यात आल्या.