एपी, केप कॅनाविरल (अमेरिका) : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था, नासाने ‘अपोलो’ मोहिमेच्या यशानंतर ५० वर्षांनी पुन्हा चंद्रावर माणूस पाठवण्याची तयारी सुरू केली आहे. यातील महत्त्वाचा टप्पा म्हणून मानवरहित मोहीम बुधवारपासून सुरू झाली. ‘अर्टेमिस’ हे आतापर्यंतचे सर्वात मोठे प्रक्षेपणास्त्र मानवी कुपी (कॅप्सूल) घेऊन चंद्राकडे झेपावले.
तांत्रिक बिघाड, वादळे यामुळे या मोहिमेला अनेक वर्षांचा विलंब झाला आहे. त्यामुळे खर्च काही अब्ज डॉलरनी वाढला असला तरी ‘नासा’ने ही मोहीम यशस्वी करण्याचा निर्धार केला आहे. अर्टेमिस प्रक्षेपणास्त्रावर ‘ओरिऑन’ हे अंतराळ यान असून त्यामध्ये पृथ्वीवर सुरक्षितरित्या परतण्यासाठी कुपी बसवण्यात आली आहे. हे अंतराळ यान चंद्राभोवती प्रदक्षिणा करेल आणि कुपी पृथ्वीकडे परत पाठवेल. अर्थात, यामध्ये सध्या अंतराळवीर नसून तीन पुतळे चंद्राकडे पाठवण्यात आले आहेत. साधारणत: तीन आठवडय़ांनंतर ही कुपी प्रशांत महासागरामध्ये उतरण्याचे नियोजन आहे. ही कुपी आणि आतमध्ये असलेले पुतळे सुरक्षितरित्या पृथ्वीवर आल्यास भविष्यात मानवी मोहीम आखली जाणार आहे.




पुन्हा ‘अपोलो’
‘अपोलो ११’ मोहिमेंतर्गत निल आर्मस्ट्राँगने २० जुलै १९६९ रोजी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले. त्यानंतर आतापर्यंत एकही मानव चंद्रावर गेलेला नाही. आता तब्बल ५० वर्षांनी ‘नासा’ने पुन्हा एकदा चंद्रावर मानव पाठवण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. आगामी काळात चंद्रावर आणि त्यानंतर मंगळावर मानव पाठवून तिथे मानवी वसाहती उभारण्याची योजना नासाने आखली आहे.