नासाने चंद्राच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी सोडलेल्या द ल्युनर अ‍ॅटमॉस्फिअर अँड डस्ट एनव्हायर्नमेंट एक्स्प्लोरर यानात उड्डाणानंतर बिघाड झाला असून, त्याचे नेमके स्वरूप नासाच्या अभियंत्यांनी शोधून काढले आहे. या बिघाडामुळे हे यान भरकटण्याची शक्यता होती. द ल्युनर अ‍ॅटमॉस्फिअर अँड डस्ट एनव्हायर्नमेंट एक्स्प्लोरर (लाडी) यानाच्या रिअ‍ॅक्शन व्हीलमध्ये उड्डाणानंतर लगेचच बिघाड झाला होता. व्हर्जिनियातील व्ॉलॉप फ्लाइट फॅसिलिटी या उड्डाणतळावरून हे यान सोडले होते. उड्डाणानंतर यानाचे रिअ‍ॅक्शन व्हील बंद पडले. प्रणोदकाशिवाय यान स्थिर करणाऱ्या चाकांचा हेतू हा अंतराळात यानाला स्थिरता प्राप्त करून देण्याचा होता. शनिवारी दुपारी हा बिघाड लक्षात आल्यानंतर या रिअ‍ॅक्शन व्हीलची अधिक काळजी घेण्यात येत आहे. आमचे अभियंते या बिघाडातून मार्ग काढतील व त्याचा यानावर परिणाम होऊ देणार नाहीत असे लाडी प्रकल्पाचे व्यवस्थापक बटलर हाइन यांनी सांगितले.
नासाच्या अ‍ॅमेस रीसर्च सेंटरचे संचालक पीट वर्डन यांनी सांगितले, की उड्डाणानंतर काही काळातच हा बिघाड झाला तरीही यान सुस्थितीत असून, त्याच्याकडून संदेश प्राप्त होत आहेत. नासाचे लाडी हे यान २८ कोटी डॉलर खर्च करून तयार करण्यात आले असून, चंद्रावरील धूळ व वातावरणाचा अभ्यास ते करणार आहे. चंद्रावरील वातावरण इतके विरल आहे, की तेथे रेणू एकमेकांशी अभिक्रिया करू शकत नाहीत. बुध व इतर काही ग्रहांच्या चंद्रावरही असेच वातावरण आहे. अपोलो मोहिमेच्या वेळी चंद्रावर एक विशिष्ट प्रकारचा प्रकाश दिसला होता, त्याचा उलगडाही या मोहिमेत केला जाणार आहे. हे यान तीस दिवसांत चंद्रावर जाणार असून, नंतर १०० दिवस तेथील वातावरणात राहणार आहे.