अमेरिकेच्या ‘नासा’ या अंतराळ संस्थेच्या ‘कॅसिनी’ अंतराळयानातर्फे १९ जुलैला शनी ग्रहावरून पृथ्वीचे पहिलेवहिले छायाचित्र काढले जाणार आहे. १.४४ अब्ज किलोमीटर अंतरावरून काढल्या जाणाऱ्या या छायाचित्रात पृथ्वी म्हणजे शनीच्या कडय़ातील एक नीलमणीच भासणार आहे!
कॅसिनीवरून १.४४ अब्ज अंतरावरील पृथ्वी ही ठिपक्याएवढीच भासणार असली तरी तब्बल १५ मिनिटांसाठी पृथ्वीचे समीपचित्रणही केले जाणार असून ईस्टर्न डेलाइट टाइम (ईडीटी)नुसार सायंकाळी ५.३० वाजता हे चित्रण सुरू होणार आहे. (भारतीय प्रमाणवेळ ही जागतिक प्रमाणवेळेपेक्षा साडेपाच तासांनी पुढे असते तर ईडीटी ही जागतिक प्रमाणवेळेपेक्षा चार तास आधी असते.) यावेळी घराच्या गच्चीवरून वा बाल्कनीतून लोकांनी शनीच्या दिशेने हात उंचावेत, असे आवाहन नासाने केले आहे.