बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय. धर्म संसदेमध्ये करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवर प्रतिक्रिया नोंदवताना शाह यांनी मोदींवर निशाणा साधलाय. मुस्लिमांचा नरसंहार करण्यासंदर्भातील वक्तव्याचा परिणाम गृह युद्धामध्ये होऊ शकतो अशी भीती व्यक्त करताना पंतप्रधान मोदींना याबद्दल काहीही वाटत नसल्याचा टोला शाह यांनी लगावलाय.

‘द वायर’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये शाह यांनी वरिष्ठ पत्रकार करण थापर यांनी मोदींच्या कार्यकाळातील मुस्लीम या विषयावर प्रश्न विचारण्यात आला. “नरेंद्र मोदींच्या भारतामध्ये मुस्लीम असणं कसं वाटतं?,” असा प्रश्न थापर यांनी विचारला असता शाह यांनी, “त्यांना उपेक्षितांप्रमाणे वागणूक दिली जातेय आणि ते अनावश्यक असल्याचं भासवलं जात आहे,” असं म्हटलं.

“मुस्लिमांना दुय्यम नागरिक बनवण्याचं काम सुरु आहे. हे सर्वच क्षेत्रांमध्ये होतंय. मुस्लिमांना असुरक्षित वाटावं यासाठी नियोजित प्रयत्न केले जात आहेत. आम्हाला असुरक्षित वाटावं असे प्रयत्न केले जातायत. मात्र आपण याला घाबरता कामा नये,” असंही शाह म्हणाले. “मुस्लिमांमध्ये भिती पसरवण्याचा प्रयत्न केले जात आहेत. यामुळे आपण घाबरलोय असं आपण मान्य करता कामा नये,” असंही शाह म्हणालेत.

नक्की वाचा >> धर्म संसदेमधील मुस्लीम नरसंहार वक्तव्यावरुन नसीरुद्दीन शाह संतापले; म्हणाले, “ते लोक खरं तर…”

मुस्लिमांच्या नरसंहाराबद्दल धर्म संसदेमध्ये करण्यात आलेल्या वक्तव्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणतीही प्रतिक्रिया न दिल्यासंदर्भातही नसीरुद्दीन शाह यांनी वक्तव्य केलंय. “त्यांना यासंदर्भात कोणतीही काळजी वाटत नाही,” असं शाह म्हणालेत. तसेच पुढे बोलताना त्यांनी मोदींच्या या भूमिकेवरुन टोला लगावलाय. “त्यांना आपण किमान ढोंगी तरी म्हणू शकत नाही,” असं मोदींनी कोणतीही भूमिका न घेतल्याबद्दल बोलताना शाह यांनी म्हटलंय. तसेच पुढे बोलताना शाह यांनी नरसंहाराची धमकी देणाऱ्यांना मोदी ट्विटरवर फॉलो करतात असं म्हटलंय. “त्यांना त्यासंदर्भात (या धमकीसंदर्भात) काळजी वाटत नाही. मात्र ते (मोदी) त्यांना (धमकी देणाऱ्यांना) ट्विटरवर फॉलो करतात,” असं शाह म्हणालेत.

नक्की वाचा >> “मला देशात असुरक्षित वाटत नाही कारण हे माझं घर आहे, पण…”; नसीरुद्दीन शाहांनी व्यक्त केली चिंता

“आपला नेता यावर शांत आहे. मात्र आपण सर्वांची काळजी करतो असा दावा त्यांच्याकडून केला जातो. ते स्वत: त्यांच्या धार्मिक श्रद्धा जपतात पण मुस्लिमांविरोधात डॉग व्हिसल्स सुरु ठेवतील,” असं शाह म्हणालेत. एखाद्या विशिष्ट गटाकडून किंवा समाजाकडून राजकीय लाभ मिळवण्याच्या हेतूने आपल्या भाषणांमधून आणि वक्तव्यांमधून संकेतिक भाषेमध्ये दुसऱ्या गटावर टीका करण्याच्या पद्धतीला डॉग व्हिसल्स असं म्हणतात.