नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधींची आज दुसऱ्यांदा ईडी चौकशी करण्यात येत आहे. चौकशीसाठी सोनिया गांधी ईडी कार्यालयात दाखल झाल्या आहेत. गेल्या पाच दिवसांपूर्वीच म्हणजे २१ जुलैला ईडीकडून त्यांची २ तासांपेक्षा जास्त चौकशी कऱण्यात आली होती. सोनिया गांधी यांच्या ईडीच्या दुसऱ्यांदा चौकशीच्या विरोधात काँग्रेसकडून आज पुन्हा एकदा देशभर निर्देशने करण्यात येत आहे.

गेल्या वेळी २ तासांपेक्षा जास्त सोनिया गांधींची चौकशी
मिळालेल्या माहितीनुसार ईडीने सोनिया गांधींना सोमवारी चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, चौकशी एका दिवसासाठी पुढे ढकलण्यात आली होती. २१ जुलै रोजी सोनिया गांधींची दोन तासापेक्षा जास्त चौकशी करण्यात आली होती. या चौकशीदरम्यान ईडीने जवळपास २८ प्रश्न विचारल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या महिन्यात जूनमध्ये ईडीकडून राहुल गांधींची जवळपास ५० तास चौकशी करण्यात आली होती.

काँग्रेसचे देशभर आंदोलन
राहुल गांधींच्या चौकशीच्या वेळीही काँग्रेस नेते, कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. जवळपास पाच दिवस काँग्रेस कार्यकर्त्यांकडून देशभरात निर्देशने करण्यात आली होती. ईडीकडून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर करण्यात आलेले आरोप निराधार असून ही कारवाई सूडाचे राजकारण असल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे.