Palestine : पॅलेस्टाइनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देण्याच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या घडामोडी सुरू आहेत. इस्रायलच्या अनेक प्रमुख मित्र राष्ट्रांनी भूमिकेत बदल करून पॅलेस्टाइनला एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून अधिकृतपणे मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि पोर्तुगालसह ब्रिटनने पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देणारं संयुक्त निवेदन जारी केलं आहे.

दरम्यान, पॅलेस्टाइनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देण्याच्या निर्णयाला इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी औपचारिक विरोध केला आहे. जॉर्जिया मेलोनी यांच्या या भूमिकेच्या विरोधात इटलीत अनेक शहरांमध्ये हजारो पॅलेस्टिनी समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. तसेच यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये काही ठिकाणी संघर्ष देखील झाल्याचं पाहायला मिळालं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

इटलीच्या मिलान शहरातील सेंट्रल स्टेशनवर हजारो पॅलेस्टिनी समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी या पॅलेस्टिनी समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच इस्रायलवर निर्बंध लादावेत, नरसंहार थांबवावा आणि पॅलेस्टाइनला न्याय मिळावा अशा घोषणा यावेळी या निदर्शकांनी केल्या. या निदर्शकांनी काही ठिकाणी हिंसाचार आणि तोडफोड केल्याचीही माहिती समोर आली आहे.

या निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला. मात्र, त्यानंतर पॅलेस्टिनी ध्वज फडकवणाऱ्या निदर्शकांच्या एका गटाने स्टेशनवरील खिडकी फोडली आणि पोलिसांच्या खुर्च्याही फेकण्याचा प्रयत्न केला. या संघर्षात ६० पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झाले. तसेच मिलान शहरात आतापर्यंत १० हून अधिक लोकांना अटक करण्यात आल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

दरम्यान, व्हेनिस बंदरावर पोलिसांनी हे निदर्शने मोडून काढण्याचा प्रयत्न केला. बोलोग्नामध्ये निदर्शकांनी महामार्ग रोखला, वाहने थांबवली आणि पोलिसांशी संघर्ष करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी निदर्शकांना पांगवलं. यावेळी निदर्शकांनी फ्री पॅलेस्टाइन आणि चला सर्वकाही ब्लॉक करूया अशा प्रकारचेही नारे दिले.

जॉर्जिया मेलोनी यांनी काय म्हटलं?

इटलीच्या अनेक शहरांत पॅलेस्टिनी समर्थकांनी केलेल्या हिंसाचाराचा र्जिया मेलोनी यांनी निषेध व्यक्त केला. तसेच यावर प्रतिक्रिया देताना हे अपमानजनक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

पॅलेस्टाईनला किती देशांचे समर्थन?

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे सोमवारपासून न्यूयॉर्क येथे सुरू होणाऱ्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या विशेष परिषदेत पॅलेस्टाईनला औपचारिक मान्यता देण्याची घोषणा करणार आहेत. एएफपी या वृत्तसंस्थेनुसार, संयुक्त राष्ट्रांच्या १९३ सदस्य देशांपैकी जवळपास १४५ देशांनी पॅलेस्टाईनला मान्यता दिली आहे. जर्मनी आणि इटलीसारख्या काही पाश्चिमात्य राष्ट्रांनी मात्र पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देण्याचा आपला कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

पॅलेस्टिनी चळवळीला इतर अनेक देशांकडूनही मोठा पाठिंबा मिळत आहे. ब्रिटनचे पंतप्रधान किअर स्टार्मर म्हणाले, “पॅलेस्टाईनला मान्यता देण्याची भूमिका ब्रिटनने जाहीर केली आहे, जेणेकरून पॅलेस्टाईन व इस्रायल यांच्यासाठी शांतता व दोन राष्ट्रांच्या समाधानाचा मार्ग जिवंत राहील.” ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांनीही अशीच भूमिका जाहीर केली आहे.