काँग्रेस स्थापना दिवसाच्या दुसऱ्याच दिवशी काँग्रेसचे नेते राहुल गांधी अचानक इटलीला रवाना झाले. त्यांची पंजाबच्या मोगा शहरात सभा होणार होती. मात्र, अचानक ते परदेशी निघून गेल्याने पंजाबमधील काँग्रेसचे नेते अस्वस्थ झाले होते. त्यानंतर मधल्या काळात होणाऱ्या त्यांच्या सभा रद्द करण्यात आल्या होत्या. ते इटलीला खासगी कामासाठी गेले आहेत आणि ५ जानेवारी रोजी ते भारतात परततील आणि ते पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांच्या संपर्कात आहेत, असे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले. दरम्यान, आता पंजाबमधील काँग्रेसचे मुख्य नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनीदेखील राहुल यांच्या इटली दौऱ्यावरून त्यांची पाठराखण केली आहे.

इंडिया टुडेशी खास बोलताना प्रदेश काँग्रेस कमिटी (पीसीसी) प्रमुख नवज्योत सिंग सिद्धू यांनी त्यांच्या इटली दौऱ्याबद्दल प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना फटकारले. ते म्हणाले, “राहुल गांधी इथे येणार होते, यात काही तथ्य नाही. लोक सुट्टीवर जातात. पंजाबमध्ये आम्ही त्यांना मतदानाच्या प्रचारासाठी सभा घेण्याची तारीख दिली नव्हती.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “राहुल किंवा प्रियंका यांच्यावर नेहमी टीका का करायची. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात ७८ जागा जिंकून काँग्रेसने पंजाबमध्ये सरकार स्थापन केले. राज्यात आठ खासदार आहेत. त्यांना राज्यात यायचे असेल तर ते केव्हाही येऊ शकतात, पण सध्या ते येणार असा कोणताही प्लॅन नव्हता, मग टीका का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

“काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे संधी असूनही त्यांनी कधीही सत्ता हाती घेतली नाही. गांधी हे सन्माननीय कुटुंबातील आहेत आणि एक दिवस राहुल गांधी हा देश बदलतील,” असे सिद्धू म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, राहुल गांधी इटली दौऱ्यावर गेल्यानंतर राज्यातील विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली होती. तर काँग्रेसच्याच काही नेत्यांमध्येही त्यांच्या या दौऱ्यामुळे नाराजी दिसत होती.