पंजाब काँग्रेसमधील वाद काही थांबण्याची चिन्ह नाहीत. आता आरुसा आलम यांच्यावरून पंजाब काँग्रेस अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिलाय. पंजाब सरकारला जनतेच्या खऱ्या विषयांचा विसर पडलाय, असं मत सिद्धू यांनी व्यक्त केलं. दुसरीकडे काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी पंजाब काँग्रेसमध्ये अराजकता तयार झाल्याचं म्हणत टीका केलीय. 

नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाबमधील काँग्रेसच्या सरकारवर टीका केलीय, तर तिवारी यांनी पंजाबचे काँग्रेस प्रभारी हरीश रावत, मल्लिकार्जुन खर्गे आणि सिद्धू यांच्यावर हल्ला चढवला.

नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले, “पंजाब सरकारने प्रत्येक पंजाबी नागरिकाला आणि भावी पिढीच्या चिंतेच्या विषयावर काम करायला हवं. आपल्यावर असलेल्या आर्थिक संकटाचा आपण कसा सामना करणार आहोत? मी वास्तव मुद्द्यांवर जोर देईल आणि सरकारला याकडे दुर्लक्ष करू देणार नाही.”

आपल्या अन्य एका ट्विटमध्ये सिद्धू म्हणाले, “आता भरून न येणारं नुकसान करून घ्यायचं की नुकसान होऊ नये म्हणून काम करायचं हे पर्याय स्पष्ट आहेत. राज्याची संसाधनं खासगी उद्योगपतींच्या खिशात न जाता परत राज्याकडे येतील यासाठी कोण काम करेल? पंजाबला पुन्हा एक श्रेष्ठ राज्य बनवण्याचं काम कोण करेल.”

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी आज (२४ ऑक्टोबर) दुपारी ३ वाजता फेसबूक लाईव्ह केल्यानंतर सिद्धू यांनी हे ट्वीट केलंय. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय.