पीटीआय, इस्लामाबाद

 स्वत:वर लादून घेतलेल्या निर्वासनाचा चार वर्षांचा काळ ब्रिटनमध्ये घालवल्यानंतर, आपल्या पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी आणि येत्या जानेवारीत होणे अपेक्षित असलेल्या सार्वत्रिक निवडणुकांत विक्रमी चौथ्यांदा सत्तेवर येण्याचा प्रयत्न करण्यासाठी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ हे शनिवारी विशेष विमानाने मायदेशी परत आले. फिक्या निळय़ा रंगाचा कुर्ता-पायजामा, किरमिजी रंगाचा मफलर व काळा कोट घातलेले ७३ वर्षे वयाचे पाकिस्तान मुस्लीम लीग- नवाझ (पीएमएल-एन) पक्षाचे हे सर्वेसर्वा ‘उमीद-इ-पाकिस्तान’ या विशेष विमानाने स्थानिक वेळेनुसार दुपारी दीड वाजताच्या सुमारास दुबईहून पाकिस्तानला येऊन पोहोचले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 शरीफ यांच्या आगमनानंतर त्यांच्या कायदेशीर चमूने त्यांची भेट घेतली व काही कागदपत्रांवर त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने १९ ऑक्टोबरला शरीफ यांना मंजूर केलेल्या जामिनाच्या प्रक्रियेचा भाग म्हणून ही कागदपत्रे न्यायालयाला सादर करायची आहेत. विमानतळावरील अधिकाऱ्यांनी शरीफ यांचे बायोमेट्रिकही घेतले. सुमारे तासभर इस्लामाबादमध्ये थांबल्यानंतर, मिनार-इ-पाकिस्तान येथील सभेला संबोधित करण्यासाठी ते लाहोरला रवाना झाले.