नक्षलवादी कारवायांमध्ये सक्रिय असलेल्या एका जोडप्याचे संघटनेच्या वरिष्ठांनी सक्तीने निर्बीजीकरण केले. त्यामुळे निराश झालेल्या जोडप्याने समाजाच्या मूळ प्रवाहात येण्यासाठी पोलिसांसमोर शरणागती पत्करल्याची घटना छत्तिसगडमधील राजनंदगाव जिल्ह्य़ात घडली. विशेष म्हणजे या नक्षली जोडप्यामधील एकाला पकडण्यासाठी पोलिसांनी बक्षीसही जाहीर केले होते.
संदीप ऊर्फ महेंद्र केरामे (२६) माओवादी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा सशस्त्र गट ५६चा सक्रिय सदस्य होता, तर त्याची पत्नी शीला ऊर्फ लता गोटा हीदेखील एका गटाशी संबंधित होती. मात्र संघटनेच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या वागणुकीमुळे निराश झालेल्या या जोडप्याने संघटनेला सोडचिठ्ठी देऊन समाजाच्या मूळ प्रवाहात येण्यासाठी शरणागती पत्करल्याची माहिती राजनंदगाव जिल्ह्य़ाचे पोलीस अधीक्षक संजीव शुक्ला यांनी दिली.
राजनंदगाव जिल्ह्य़ातील रहिवासी असलेला  संदीप गडचिरोलीतील नक्षलवादी संघटनेशी जोडल्यानंतर २०११मध्ये आपल्या कुटुंबासह तेथे राहत होता.
या काळात महिला नक्षलवादी शीलाशी  त्याची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर दोघांनी संघटनेच्या वरिष्ठांच्या परवानगीने लग्न केले. मात्र ज्यावेळी त्यांनी मुलांचा विचार केला, तेव्हा संघटनेच्या नेत्यांनी त्यास विरोध केला आणि दोघांचे सक्तीने निर्बीजीकरण केले. त्यामुळे नाराज झालेल्या संदीप आणि शीलाने नक्षलवादी संघटना सोडण्याचा निर्णय घेतल्याचे शुक्ला यांनी सांगितले.
१८ मे रोजी महाराष्ट्रातील कोंडे भागात असलेल्या नक्षली शिबिरातून पलायन करीत दोघांनी राजनंदगाव पोलिसांसमोर शरणागती पत्करली.