वृत्तसंस्था, नवी दिल्ली : विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीने विविध वृत्तवाहिन्यांच्या १४ वृत्तनिवेदकांवर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयाचा न्यूज ब्रॉडकास्टिंग अँड डिजिटल असोसिएशनने (एनबीडीए) निषेध केला. बहिष्काराच्या या निर्णयामुळे दु:ख आणि चिंता वाटत असल्याचे एनबीडीएने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. हा निर्णय घातक पायंडा पाडत आहे अशी टीका त्यामध्ये करण्यात आली आहे.
‘भारतातील आघाडीच्या वृत्तनिवेदकांच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा हा प्रकार लोकशाहीच्या तत्त्वांविरोधात आहे. यातून असहिष्णुता दिसून येते आणि माध्यमांचे स्वातंत्र्य धोक्यात येते’, असा मुद्दा या निवेदनात मांडण्यात आला आहे. तसेच हा भारताला पुन्हा आणीबाणीकडे घेऊन जाण्याचा प्रकार असल्याची टीका एनबीडीएने केली आहे.
विरोधी पक्षांची आघाडी बहुतत्त्ववादाचा आणि मुक्त माध्यमांचा पुरस्कार असल्याचा दावा करते, पण त्यांचा बहिष्काराचा निर्णय हा संकल्पना व मते मुक्तपणे मांडण्याच्या लोकशाहीच्या सर्वात मूलभूत अधिकाराचा सन्मान करत नाही, असा आरोप एनबीडीएने केला आहे. सर्वात शेवटी, विशिष्ट पत्रकार आणि वृत्तनिवेदकांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.