देशाच्या राजकारणात सध्या खासदारांचं निलंबन हा मुद्दा प्रचंड चर्चेत आहे. लोकसभेत दोन तरुणांनी घुसखोरी करून स्मोक कँडलचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर त्यावरून विरोधकांनी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन करण्याची मागणी लावून धरली. यामुळे मोठा गदारोळ झाला. यावर कारवाई म्हणून संसदेच्या दोन्ही सभागृहांचे मिळून आत्तापर्यंत १४१ खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. यावरून विरोधकांकडून संतप्त प्रतिक्रिया येत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निलंबनाच्या कारवाईवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

‘उत्तम संसदपटू’ सुप्रिया सुळेंचंही निलंबन!

तब्बल पाच वेळा उत्तम संसदपटू म्हणून निवड करण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचंही लोकसभेत गोंधळ घातला म्हणून निलंबन करण्यात आलं. त्यामुळे शरद पवार गटाकडून यावर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे दुसरे खासदार अमोल कोल्हे यांचंही निलंबन करण्यात आलं आहे. या निलंबनाच्या कारवाईवर शरद पवारांनी टीव्ही ९ ला प्रतिक्रिया देताना हा सगळा सत्तेचा गैरवापर असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले शरद पवार?

“काही लोकांनी सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांकडून पास घेऊन सदनात प्रवेश घेतला. प्रेक्षक गॅलरीतून उडी टाकली.विशिष्ट प्रकारचा गॅस फोडायचा प्रयत्न केला. संसदेच्या बाहेरही तसाच प्रयत्न केला. ही अतिशय गंभीर बाब होती. ५०० पेक्षा जास्त खासदार तिथे बसतात. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न होता. याची माहिती आम्हाला द्या ही मागणी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केल्यानंतर ही माहिती देण्याची तयारी सत्ताधारी पक्षाची नाही”, असं शरद पवार म्हणाले.

“खासदारांवर कारवाई झाली याचा अर्थ…”

“गृहमंत्र्यांनी सदनात येऊन ते कोण लोक होते? त्यांचा हेतू काय होता? त्यांच्यावर काय कारवाई करणार याची माहिती द्यावी ही मागणी विरोधकांनी केल्यानंतर त्यांच्यावरच कारवाई केली गेली? ही यंत्रणा सांभाळण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती, त्यांच्यावर कारवाई नाही पण जे घडलं त्याची माहिती मागतात म्हणून खासदारांवर ही कारवाई करण्यात आली. याचा अर्थ संसदीय लोकशाहीसंदर्भातली प्रतिष्ठा आणि रक्षण याबाबत सत्ताधाऱ्यांना यत्किंचितही गांभीर्य नाही याचं हे उदाहरण आहे”, अशा शब्दांत शरद पवारांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे.

“…हे सगळं खेदजनक आहे”, शरद पवारांचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना पत्र; खासदार निलंबनाचा उल्लेख करत म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“माहिती मागणाऱ्या सदस्यांवर कारवाई केली गेली. मग त्या सुप्रिया सुळे असोत किंवा अमोल कोल्हे असोत. सुप्रिया सुळेंना पाच वेळा उत्तम संसदपटू म्हणून पारितोषिक मिळालं. सभागृहात आमच्या पक्षाचं हे धोरण नेहमीच राहिलं आहे की वेलमध्ये जायचं नाही, नियम तोडायचा नाही. मी ५६ वर्षं राजकारणात आहे. पण मी एकदाही कधी मधल्या वेलमध्ये गेलो नाही. हे धोरण आम्ही पाळतो. असं असताना अशी कारवाई करणं हा सरळ सरळ सत्तेचा गैरवापर आहे”, असंही शरद पवार म्हणाले.