scorecardresearch

राष्ट्रवादीला मोठा धक्का, शरद पवारांच्या निकटवर्तीय खासदाराचं सदस्यत्व रद्द; काय आहे कारण?

मोहम्मद फैजल हे लक्षद्वीपमधून दोनवेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत.

राष्ट्रवादीला मोठा धक्का, शरद पवारांच्या निकटवर्तीय खासदाराचं सदस्यत्व रद्द; काय आहे कारण?
मोहम्मद फैजल शरद पवार ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा पक्षाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रसचे लक्षद्वीप येथील खासदार मोहम्मद फैजल यांचं लोकसभेतील सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. मोहम्मद फैजल यांना एका प्रकरणात दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यानंतर मोहम्मद फैजल यांना अपात्र करण्यात आलं असल्याची माहिती लोकसभा सचिवालयाकडून शुक्रवारी रात्री देण्यात आली.

२००९ साली लोकसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान काँग्रेसचे नेते पी.एम. सईद यांचे जावई आणि काँग्रेस नेते मोहम्मद सालेह यांच्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्यात जखमी झालेल्या सालेह यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सालेह यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणात फैजल यांनी मदत केल्याचा आरोप आहे. याप्रकरणात लक्षद्वीपमधील कवरत्ती जिल्हा आणि सत्र न्यायालयाने खासदार फैजल यांच्यासह अन्य तीन जणांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तसेच, चारही जणांना एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

हेही वाचा : ‘मी लघुशंका केलीच नाही’ शंकर मिश्राच्या दाव्यानंतर महिलेची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाल्या…

दरम्यान, २०१४ आणि २०१९ साली मोहम्मद फैजल हे राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर लोकसभेत निवडून आले होते. ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. लोकसभेत मोहम्मद फैजल हे लक्षद्वीपच्या प्रश्नांवर रोखठोक भूमिका मांडताना दिसले आहेत. शिक्षा सुनावल्यानंतर मोहम्मद फैजल यांनी म्हटलं की, “माझ्यावर राजकीय सूडबुद्धीने ही कारवाई केली जात आहे. या निर्णयाविरोधात केरळ उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.”

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-01-2023 at 15:37 IST

संबंधित बातम्या