दहशतवादी ते भाजपा उमेदवार या प्रज्ञा ठाकूर यांच्या प्रवासात भाजपाचे मोठे योगदान राहिले आहे. भाजपाचा खोटा राष्ट्रवाद आणि बेगडी देशप्रेमाचा बुरखा फाटला असून महाराष्ट्राचे थोर सुपुत्र शहीद हेमंत करकरे यांचा अपमान करणा-या प्रज्ञा ठाकूर यांना उमेदवारी देताना भाजपाला लाज कशी वाटत नाही? असा संतप्त सवाल करून जराही लाज असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गांधीभवन येथे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने संयुक्त पत्रकार परिषद घेत भाजपावर टीका केली. सचिन सावंत आणि नवाब मलिक यांनी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या उमेदवारीवर प्रश्न उपस्थित केले. यावेळी बोलताना सावंत म्हणाले की, प्रज्ञा सिंह यांनी महाराष्ट्राचे महान वीरपुत्र शहीद हेमंत करकरे यांचा अवमान केला आहे. हा फक्त करकरेंचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा आणि शहीदांचा अवमान आहे. शहीदांच्या शौर्याचा राजकीय फायद्यासाठी वापर करणा-या पंतप्रधान मोदी आणि भाजपाने तात्काळ माफी मागावी आणि प्रज्ञा ठाकूर यांची तत्काळ हकालपट्टी करावी.

महाराष्ट्राचे वीरपुत्र शहीद हेमंत करकरेंचा अपमान करणा-या प्रज्ञा ठाकूरचा मुख्यमंत्र्यांनी अद्याप साधा निषेधही केला नाही. महाराष्ट्राचा अवमान केल्याबद्दल मोदी शाह यांना आनंद होत असेल पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि भाजपाला हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहताना लाज कशी वाटत नाही?असा संतप्त सवाल विरोधकांनी विचारला.

करकरे परिवाराने आपला कुटुंबप्रमुख गमावला त्याचे दुःख पचवताना एकच प्रामाणिक अपेक्षा ठेवली की आपल्या कुटुंबाच्या बलिदानाचा देशातील जनता आदर राखेल परंतू या भावनेलाच भाजपाने बाधा पोहोचवली आहे. आता भाजपाने शहीद करकरेंना देशद्रोही ठरवले आहे त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना प्रचंड वेदना होत असतील. काँग्रेस पक्ष शहीद करकरे कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असे सावंत म्हणाले.

भाजपाने साध्वी प्रज्ञासिंग ठाकुर यांना उमेदवारी देवून दहशतवादाला समर्थन दिले आहे हे स्पष्ट होत असून साध्वीच्या रुपाने भाजपाचा खरा चेहरा समोर आला आहे. भाजपा दहशतवादाशी लढत असल्याचे ढोंग करत आहे हे स्पष्ट असून भाजपाचा खरा चेहरा समोर आला आहे, असा दावा नवाब मलिक यांनी केला.

माझ्या शापाने देशद्रोही हेमंत करकरे यांचा मृत्यू झाला असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा नवाब मलिक यांनी चांगलाच समाचार घेतला. भाजपाच्या माध्यमातून शहींदाचा अपमान करण्याचे काम केले जात आहे. जसे मोदी स्क्रीनवर स्क्रीप्ट वाचून बोलतात. त्याप्रमाणे साध्वी यांना भाजपकडून स्क्रीप्ट लिहून देण्यात आली होती असा आरोप करतानाच भाजपाने जिवंतपणी हेमंत करकरे यांच्यावर खोटे आरोप केले आणि शहीद झाल्यावरही देशद्रोहाचा ठपका ठेवला, असे त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp nawab malik congress sachin sawant slams bjp over sadhvi pragya
First published on: 19-04-2019 at 18:19 IST