राज्यात सत्ताधारी आणि विरोधक संघर्ष सुरु असतानाच दिल्लीत मोठी घडामोड झाल्याची पहायला मिळत आहे. एकीकडे राज्य सरकार केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जात असल्याने सतत केंद्रातील भाजपा सरकारविरोधात वक्तव्यं करत जाहीर निषेध करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये भेट झाली आहे. शरद पवार आणि नरेंद्र मोदींमध्ये पंतप्रधान कार्यालयात जवळपास २० मिनिटं चर्चा सुरु होती. या भेटीमुळे राज्यासहित दिल्लीतील राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यावेळी नेमकी काय चर्चा झाली हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात याआधीही भेटी झाल्या आहेत. देशाच्या राजकारणातील मोठे नेते असणाऱ्या शरद पवार आणि मोदींमध्ये भेट झाल्यानंतर त्याची नेहमीच चर्चा होत असते. मात्र यावेळी शरद पवारांनी घेतलेली भेट आणि महाराष्ट्रातील घडामोडी यामुळे याची चर्चा रंगली आहे. महाराष्ट्रात ईडीकडून सत्ताधारी नेत्यांवर कारवाई सुरु असून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत तर दुसरीकडे पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपाला मिळालेलं यश पाहता या निवडणुकीचं महत्व वाढलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी १२.३० च्या सुमारास पंतप्रधान कार्यालयात ही भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये २० ते २५ मिनिटं चर्चा सुरु होती. या भेटीत फक्त दोन्ही नेते उपस्थित असल्याचं समजत आहे. पण यावेळी नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा झाली याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण यावेळी राजकीय चर्चाही झाल्याची शक्यता आहे.

भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एबीपी माझाशी बोलताना या भेटीकडे राजकीय दृष्टीने पाहू नये असं म्हटलं आहे. “नितीन गडकरीदेखील शरद पवारांच्या निवासस्थानी भोजनाला उपस्थित होते. आज शरद पवार आणि मोदींची भेट झाली. पण यातून राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. हा एका राजकीय परंपरेचा भाग आहे. विचारांचे मतभेद असले तरी मनभेद असण्याची गरज नाही. शब्दांचा योग्य उपयोग, एकमेकाचा सन्मान करताना योग्य क्षणी भाव व्यक्त करणं हा यामागचा भाग आहे,” असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत. त्यांच्यात काही राजकीय किवा महाराष्ट्राबद्दल चर्चा झाली का हे सांगणं सध्या शक्य नाही असंही ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp sharad pawar and pm narendra modi meet in new delhi sgy
First published on: 06-04-2022 at 13:43 IST