राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीमधील निवासस्थानी असणारी सुरक्षा हटवण्यात आली आहे. सुरक्षा हटवण्याआधी केंद्र सरकारकडून कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती असं सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून या निर्णयावर आक्षेप नोंदवण्यात आला असून संताप व्यक्त करण्यात आला आहे. केंद्र सरकारने जाणुनबुजून शरद पवारांची सुरक्षा कमी केल्याचा आरोप राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. सुरक्षा काढली म्हणून शरद पवार घराबाहेर पडणार नाहीत का ? असा सवालही त्यांनी विचारला आहे.

शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी सुरक्षेसाठी दिल्ली पोलिसांचे तीन आणि सीआरपीएफचे तीन जवान तैनात होते. मात्र २० जानेवारीपासून ही सुरक्षा हटवण्यात आली आहे. सुरक्षा काढण्याआधी कोणताही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती अशी माहिती शरद पवारांच्या दिल्लीमधील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून अतिमहत्त्वाच्या (व्हीव्हीआयपी) व्यक्तींना सुरक्षा पुरवली जाते. त्यामुळे शरद पवार यांच्या दिल्लीमधील निवासस्थान ‘सहा जनपथ’ येथे दिल्ली पोलीस आणि सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले होते. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सुरक्षेवरील ताण तसंच आंदोलनं लक्षात घेता हा निर्णय केंद्र सरकारने घेतला असावा अशी शक्यता व्यक्त होत आहे. मात्र त्याची कल्पना संबंधित व्यक्तीला देण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याआधी केंद्र सरकारकडून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांची एसपीजी सुरक्षा हटवण्यात आल्यानंतर वाद निर्माण झाला होता. यानंतर केंद्र सरकारने जाणुनबुजून सुरक्षा हटवली असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह यांच्याही एसपीजी सुरक्षेत बदल करण्यात आला होता.