बिहार विधानसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या महाआघाडीत आमच्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप सपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केला असला तरी नितीशकुमार यांनी त्याकडे कानाडोळा केला आहे. घटकपक्षांमध्ये जागावाटप झाले असल्याने त्याबाबत फेरविचार करण्याची गरज नाही, असे नितीशकुमार यांनी स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेससाठी आम्ही तीन जागा सोडल्या आहेत त्यामुळे महाआघाडीत राहावयाचे की नाही या बाबतचा निर्णय त्या पक्षाने घ्यावयाचा आहे, असे नितीशकुमार यांनी येथे वार्ताहरांना सांगितले. जागावाटपाबाबत २० ऑगस्टपर्यंत फेरविचार करा, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी दिला होता, त्यानंतर नितीशकुमार यांनी वरील बाब स्पष्ट केली. विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला किमान १२ जागांवर उमेदवारी हवी आहे, ही मागणी मान्य न झाल्यास आमच्यासमोर अनेक पर्याय खुले आहेत, असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने नोंदविलेला निषेध आणि सपाने धरलेले धरणे याची नितीशकुमार यांनी खिल्ली उडविली. सर्व गोष्टी सुरळीत पार पडल्या तर मीडिया काय लिहिणार, असा सवाल नितीशकुमार यांनी केला. जद(यू), राजद आणि काँग्रेसने जागावाटपाचा निर्णय जाहीर केला आहे.
‘मांझी’ करमुक्त
‘मांझी – द माऊण्टन मॅन’ हा चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी येथे सांगितले. गया जिल्ह्य़ातील गैहलौर गावातील गरीब कामगार दशरथ मांझी यांच्या जीवनावर हा चित्रपट तयार करण्यात आला आहे.
दशरथ मांझी यांना ‘माऊण्टन मॅन’ म्हणून ओळखले जाते. हा चित्रपट केतन मेहता यांनी दिग्दर्शित केला असून नवाझुद्दीन सिद्दिकी यांनी मांझी यांची भूमिका साकारली आहे.
विशेष पॅकेजच्या घोषणेची प्रतीक्षा
सहारसा येथे मंगळवारी होणाऱ्या मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारसाठी विशेष पॅकेज जाहीर करणार असल्याचा दावा भाजपचे नेते करीत असले तरी आपण अद्याप नव्या पॅकेजबद्दल अनभिज्ञ असल्याचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी स्पष्ट केले आहे.