लॉकडाउनमुळे अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. अर्थव्यवस्थेसंदर्भातही अनेक तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. असे असतानाच दुसरीकडे मध्य प्रदेशमधील एका व्यक्तीला या आर्थिक चणचणीच्या काळात जणू लॉट्रीच लागली आहे. रानीपूर येथील खाण मालकाला चक्क १०.६९ कॅरेटचा हिरा सापडला आहे. या हिऱ्याची किंमत ५० लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे. आनंदी लालकुशवाहा असं या खाण मालकाचे नाव असून त्याने हिरा सरकारी अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे मागील आठवड्यात याच खाणीमध्ये आनंदी यांना हिरा सापडला होता. मात्र तो आता सापडलेल्या हिऱ्याइतका मौल्यवान नव्हता.

नक्की वाचा >> याला म्हणतात नशीब… ‘या’ अनमोल गोष्टींमुळे रातोरात झाला २५ कोटींचा मालक

मिळालेल्या माहितीनुसार राणीपूर येथील खाणीचे कंत्राट आनंदीलाल यांच्याकडे आहे. याच खाणीमध्ये खोदकाम सुरु असताना त्यांना १०.६९ कॅरेटाचा हिरा सापडला. हा हिरा त्यांनी स्थानिक हिरा कार्यालयामध्ये सरकारी अधिकाऱ्यांकडे जमा केला आहे. पन्ना येथील हिरा कार्यालयातील अधिकारी आर. के. पांडे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मागील आठवड्यामध्येच आनंदी यांनी ७० सेंट प्रकारचा हिरा कार्यालयामध्ये आणून आमच्या ताब्यात दिल्याची माहितीही पांडे यांनी दिली. करोना लॉकडाउननंतर पहिल्यांदाच पन्ना जिल्ह्यामध्ये एवढा मौल्यवान हिरा सापडल्याचेही सरकारी अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

या हिऱ्याचा लवकरच लिलाव केला जाणार आहे. या हिऱ्याला मिळणाऱ्या किंमतीमधून कर आणि रॉयल्टीची रक्कम वजा करुन उर्वरित रक्कम ही हिरा जमा करणाऱ्या व्यक्तीला दिली जाईल असंही सरकारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. या हिऱ्याची नक्की किंमत किती आहे यासंदर्भातील पहाणी अजून झालेली नसली तरी सरकारी अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार या हिऱ्याची किंमत ५० लाखांच्या आसपास असू शकते.

 

मागील सहा महिन्यापासून मी आणि माझे कुटुंब या खाणीमध्ये काम करत असून हा हिरा सापडल्याने आम्हाला खूप आनंद झाला आहे, असं आनंदीलाल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे. मध्य प्रदेशमधील बुंदेलखंड प्रदेशात येणारा पन्ना जिल्हा हा येथे सापडणाऱ्या हिऱ्यांसाठी लोकप्रिय आहे.