रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) आज (दि.२५) २०० रूपयांची नवी नोट चलनात उपलब्ध करून दिली आहे. आता ही नोट तुम्हाला एटीएममधून लगेच मिळेल असे वाटत असेल तर तुम्हाला थोडा काळ वाट पाहावी लागणार आहे. कारण एटीएममधून २०० रूपयांची नोट डिस्पॅच करण्याची सुविधा देण्यास वेळ लागणार आहे. एका विशिष्ट एटीएममध्ये ३-४ कॅसेट असतात. ज्या नोटांच्या विविध आकारांना सांभाळण्यासाठी सज्ज असतात. २०० रूपयांच्या नोटा देण्यासाठी सक्षम होण्यासाठी पुन्हा एकदा त्यात बदल करावा लागणार आहे. यासाठी वेळ लागू शकतो. या नोटा सेट करण्यासाठी आम्हाला आणखी काही वेळ पाहिजे, असे एटीएम निर्माता कंपनी एफआयएसचे मुख्य संचालक राधाराम दुराई यांनी सांगितले. सध्या एटीएममध्ये केवळ १००, ५०० आणि २००० रूपयांच्या नोटा डिस्पॅच करता येतात.

यूरोनेट सर्व्हिसेस इंडिया प्रा.लि.चे मुख्य संचालक हिमांशु पुजारा म्हणाले, २०० रूपयांची नवीन नोट ही सध्या अस्तित्वात असलेल्या चलनापेक्षा वेगळी आहे. यासाठी कॅसेट कॅलिब्रेशनची गरज आहे. एटीएम निर्मात्यांना २०० रूपयांच्या नोटेचे परीक्षण करण्याची आवश्यकता आहे.

एटीएममध्ये बदल करण्यासाठी एटीएम सेवा देणाऱ्यांना सर्वांत आधी नोटेचा अभ्यास करण्यासाठी ती मिळवून देणे आवश्यक आहे. एटीएमच्या प्रत्येक कॅसेटमध्ये २५०० नोट ठेवता येतात. ही सुविधा देण्यासाठी किमान एक आठवड्याचा कालावधी लागू शकतो.

[jwplayer fP09Fw8O-1o30kmL6]