नवी दिल्ली : वैद्याकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या यंदाच्या ‘नीट-यूजी’ परीक्षेमध्ये ६३ गैरप्रकार झाले असून त्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र पेपरफुटीची एकही घटना घडली नसून या परीक्षेचे पावित्र्य अबाधित आहे, असा दावा नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) अधिकाऱ्यांनी बुधवारी केला.

परीक्षेमध्ये झालेल्या कथित गैरप्रकारांमुळे यंदाची ‘नीट’ वादाच्या भोवऱ्यात अडकली असून विद्यार्थी फेरपरीक्षा घेण्याची मागणी करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयासह देशभरातील विविध न्यायालयांमध्ये याचिकाही दाखल झाल्या असून मंगळवारी सुनावणीदरम्यान ‘नीट’च्या पावित्र्याला धक्का बसल्याचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या सुटीकालीन खंडपीठाने नोंदविले होते. या पार्श्वभूमीवर बुधवारी एनटीएचे महासंचालक सुबोधकुमार सिंह यांनी प्रतिक्रिया दिली. परीक्षेत नकली उमेदवार, ओएमआर शीटची छेडछाड, बनवेगिरी अशा गैरप्रकारांबाबत चौकशी करण्यासाठी परीक्षा आणि शैक्षणिक क्षेत्रातील तीन तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने केलेल्या शिफारसींच्या आधारे २३ जणांवर विविध कालावधीसाठी बंदी घालण्यात आली असून उर्वरित ४० जणांचे निकाल राखून ठेवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> संसदेत दर्जेदार चर्चा व्हायला हवी – रिजिजू

६७ विद्यार्थ्यांना ७२० पैकी ७२० गुण मिळाल्यावरून टीका होत असून याबाबत सिंह म्हणाले, की यातील ४४ विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्राच्या उत्तरतालिकेच्या पडताळणीनंतर तर सहा जणांना वेळ वाया गेल्यामुळे वाढीव गुण मिळाले आहेत. वाढीव गुण मिळालेल्यापैकी केवळ दोघांना ७१८ आणि ७१९ गुण आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फेरपरीक्षा की वेगळी यंत्रणा ?

परीक्षेत वेळेचे नुकसान झाल्याच्या कारणाने १,५६३ विद्यार्थ्यांना वाढीव गुण (ग्रेस मार्क) देण्यात आले असून त्याविरोधात प्रचंड रोष आहे. याची चौकशी करण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने चार सदस्यांची चौकशी समिती स्थापन केली आहे. या समितीच्या अहवालाची प्ररतीक्षा असून त्यानंतर सुमारे १,६०० विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घ्यायची की कुणावर अन्याय होऊ नये, यासाठी गुणांसाठी एखादी वेगळी प्रणाली वापरायची याचा निर्णय घेतला जाईल, असे सुबोधकुमार सिंह यांनी स्पष्ट केले.