Nepal Protest : नेपाळमधील ‘जेन-झी’ने सरकारविरोधात सुरू केलेल्या निदर्शनांनी मोठ्या प्रमाणात उग्र स्वरूप धारण केल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर अखेर के. पी. शर्मा ओली यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला. आंदोलकांचा रोष एवढा होता की त्यांनी नेपाळची संसद, सर्वोच्च न्यायालय आणि इतर महत्त्वाच्या काही इमारतींनाही आग लावली. नेपाळमधील परिस्थिती सध्या पूर्व पदावर आणण्यासाठी लष्कर प्रयत्न करत आहे.

दरम्यान, काठमांडूमध्ये आंदोलकांनी काही हॉटेलला लावलेल्या आगीत एका भारतीय महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अद्यापही डझनभर भारतीय पर्यटक नेपाळमध्ये अडकून पडले आहेत. भारतीय महिलेचा मृत्यू झाल्याने गाझियाबादमधील एका कुटुंबासाठी नेपाळची धार्मिक यात्रा दुर्दैवी ठरली आहे. रामवीर सिंग गोला (५८) आणि त्यांची पत्नी हे ७ सप्टेंबर रोजी पशुपतिनाथ मंदिराचे दर्शन घेण्यासाठी काठमांडूला गेले होते. मात्र, त्यानंतर ९ सप्टेंबरच्या रात्री हिंसक आंदोलनात हॉटेल जाळण्यात आल्याने त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

नेमकं काय घडलं?

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, रामवीर गोला आणि त्यांची पत्नी राजेश गोला हे एका हॉटेलच्या वरच्या मजल्यावर मुक्कामी होते. मात्र, त्याचवेळी आंदोलकांनी हॉटेलला आग लावली. त्यानंतर रामवीर यांनी पडद्याचा वापर करून पत्नीला सुरक्षित ठिकाणी खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या हातातून पत्नी निसटली. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या आणि जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करत असताना त्यांचा मृत्यू झाला.

शुक्रवारी सकाळी १०:३० वाजता कुटुंबातील सदस्यांनी तिचा मृतदेह गाझियाबाद येथील त्यांच्या घरी आणला. दरम्यान, त्यांच्या मुलाने म्हटलं की, “जमावाने हॉटेलवर हल्ला केला आणि त्यानंतर आग लावली. त्यानंतर माझ्या वडिलांनी खिडकीची काच तोडली. माझी आई खाली उतरण्याचा प्रयत्न करत असताना पाय घसरून पडली.” दरम्यान, नेपाळमधील हिंसक निदर्शनांमुळे तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. भारतीय यात्रेकरूंचे अनेक गटही त्या ठिकाणी अडकले आहेत. महाराजगंजमधील भारत-नेपाळ सीमेवर परतणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे, कारण अनेकांनी त्यांचे प्रवास अर्धवट सोडले आहेत.

कोण आहेत हे Gen-Z?

Gen-Z जेन-झी ही एक पिढी आहे, तिला जनरेशन झेड असे म्हटले जाते. ज्यांचा जन्म १९९७ ते २०१२ दरम्यान झाला आहे ती पिढी म्हणजे जेन-झी. म्हणजे आताच्या काळात हे लोक किशोरवयीन आणि तरूण मुलं-मुली आहेत. ही पिढी डिजिटल टेक्नॉलॉजी, इंटरनेट, सोशल मिडिया आणि स्मार्टफोन यासोबतच वाढली आहे. या पिढीतील लोक सोशल मीडियावर सर्वात जास्त सक्रिय राहतात.

आंदोलनात कोण सामील होते?

काठमांडू इथल्या आंदोलनात हजारो तरूण सामील होते. नेमकं हेच कारण आहे की या आंदोलनाला ‘जेन-झी रिव्होल्यूशन’ (Gen-Z Revolution) असं म्हटलं आहे. या आंदोलनात विद्यार्थी आणि नव्या पिढीतील तरूणांनी सरकारविरूद्ध आवाज उठवला.