US and China : अमेरिका आणि चीनमध्ये काही दिवसांपूर्वी टॅरिफ वॉर रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. ट्रम्प यांनी सातत्याने चीनला लक्ष्य करत चिनी वस्तूंवर १०० टक्के आयातशुल्क (टॅरिफ) लादण्याची घोषणा केली होती. त्यानंतर अमेरिकेला प्रत्युत्तर म्हणून चीनने देखील अमेरिकन वस्तूंवर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लादत जशास तसं प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळालं होतं. या ‘टॅरिफ वॉर’मुळे जगातील या दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील व्यापारी संबंध ताणले गेले होते.
तसेच अमेरिका आणि चीनमध्ये टॅरिफच्या मुद्यांवरून आजही उघडपणे मतभेद आहेत. पण असं असतानाही आता अमेरिका आणि चीनमध्ये मैत्रीचा नवा अध्याय सुरू झाल्याचं दिसून येत आहे. दोन्ही देशांनी संरक्षण क्षेत्रात सहकार्य वाढण्याचा निर्णय घेतला आहे. आता अमेरिका आणि चीन या दोन देशांच्या लष्करांमध्ये थेट संवाद साधण्यासाठी एक अनौपचारिक किंवा औपचारिक माध्यम तयार करण्यास सहमती दर्शवली आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर काही दिवसांतच अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे सचिव पीट हेगसेथ यांनी रविवारी सांगितलं की, “त्यांनी चीनचे संरक्षण मंत्री अॅडमिरल डोंग जून यांची भेट घेतली आणि दोघांनीही दोन्ही देशांतील संवाद मजबूत करण्यास तसेच द्विपक्षीय संबंधांमध्ये स्थिरता राखण्यास आणि उद्भवणाऱ्या कोणत्याही समस्या सोडवण्यासाठी आणि दोन्ही देशांतील तणाव कमी करण्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांतील लष्कर ते लष्कर असा संवाद घडवून आणण्यासाठी चॅनेल स्थापित करण्यास सहमती दर्शवण्यात आली आहे”, असं पीट हेगसेथ यांनी सांगितलं.
तसेच पीट हेगसेथ यांनी सांगितलं की मलेशियामध्ये चीनचे संरक्षण मंत्री अॅडमिरल डोंग यांना भेटले आणि त्यांनी शनिवारी पुन्हा चर्चा केली. तसेच याआधी डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्यात ३० ऑक्टोबर रोजी दक्षिण कोरियात बैठक झाली होती. यावेळी दोघांनीही अमेरिका आणि चीनसाठी शाश्वत शांतता आणि द्विपक्षीय संबंधांमध्ये स्थिरता राखण्यास सहमती दर्शवली होती.
