जगावरील करोनाचं संकट कमी होत असल्याचं वाटत असतानाच इस्त्रालयाने पुन्हा एकदा जगाची चिंता वाढवली आहे. इस्त्रायलमध्ये करोनाचा नवा व्हेरियंट आढळला आहे. नव्या व्हेरियंटचे दोन रुग्ण आढळले असल्याची माहिती इस्त्रायलने दिली आहे. हा व्हेरियंट जगासाठी अद्यापही अनोळखी असल्याचं इस्त्रायलच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे. दरम्यान इस्रायललमधील साथीच्या रोगांच्या प्रमुखांनी या नवीन व्हेरियंटबद्दल भीती बाळगू नये असं आवाहन केलं आहे.

या नव्या व्हेरियंटमध्ये ओमायक्रॉनच्या (Omicron) आवृत्तीचे दोन उप-प्रकार BA.1 आणि BA.2 एकत्र आले आहेत. याआधी डेल्टाक्रॉनच्या (Deltacron) वेळीदेखील दोन व्हेरियंट एकत्र आल्याचं पाहण्यास मिळालं होतं. डेल्टा आणि ओमायक्रॉन व्हेरियंट एकत्र येऊन डेल्टाक्रॉन हा नवा व्हेरियंट तयार झाला होता.

लक्षणं काय?

या नव्या व्हेरियंटमध्ये हलका ताप, डोकेदुखील आणि स्नायूंचं दुखणं अशी लक्षणं जाणवत आहेत. दरम्यान इस्त्रायलच्या आरोग्य मंत्रालयाने या नव्या व्हेरियंटसाठी तात्काळ वैद्यकीय मदत घेण्याची गरज नसल्याचं सांगत दिलासा दिला आहे.

कुठे आढळला व्हेरियंट?

इस्त्रायलमधील बेन गुरियन (Ben Gurion) विमानतळावर दोन प्रवाशांची चाचणी करण्यात आली असता हा नवा व्हेरियंट आढळला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इस्त्रायलने यावेळी चिंता करण्याचं कारण नसून दोन व्हेरियंट एकत्र येणं हे काही नवीन नसल्याचं सांगितलं आहे. रुग्णसंख्या वाढण्याची आम्हाला कोणतीही चिंता नसल्याचं कोविड पथकाच्या प्रमुखांनी म्हटलं आहे. याआधी जानेवारी महिन्यात इस्त्रायलमध्ये फ्लोरोनाच्या (florona) पहिल्या रुग्णाची नोंद झाली होती.