‘बुली बाई’ अॅप प्रकरणातील मुख्य आरोपी नीरज बिश्नोईबाबत नवे खुलासे झाले आहेत. नीरजला वयाच्या १५ व्या वर्षापासून हॅक करण्याची, वेबसाइट्स स्पूफ करण्याची आणि शिकण्याची सवय आहे, अशी कबुली त्याने दिली आहे. आयएफएसओचे पोलीस उपायुक्त केपीएस मल्होत्रा यांनी सांगितले की, त्याने भारतासह पाकिस्तानमधील शाळा आणि विद्यापीठांच्या विविध वेबसाइट्स हॅक केल्याचा दावा केला आहे.
बुली बाई अॅप प्रकरणातील मुख्य आरोपी आणि सूत्रधार नीरज बिश्नोई याचे वर्णन पोलिसांनी एक धूर्त, असंवेदनशील तरुण असे केले आहे ज्याच्याकडून माहिती मिळवणे फार कठीण आहे. एवढेच नाही तर नीरजने पोलीस कोठडीत आत्महत्येची धमकीही दिली असून यादरम्यान त्याने दोनदा स्वतःला इजा करण्याचाही प्रयत्न केला आहे. दिल्ली पोलिसांच्या आयएफएससी स्पेशल सेलने ही माहिती दिली आहे. ४८ तासांहून अधिक काळ पोलीस कोठडीत राहिल्यानंतर बिष्णोई दर तासाला काहीतरी नवीन खुलासा करत आहे. न्यायालयाने गुरुवारी बिष्णोईला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
Bulli Bai App: मुस्लिम महिलांचे फोटो टाकत लिलाव करणारं हे प्रकरण नेमकं काय आहे?
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, दिल्ली आणि मुंबई पोलिसांनी बुली बाई अॅप प्रकरणात आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे. या अॅपचा मुख्य आरोपी नीरज बिश्नोई याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. केपीएस मल्होत्रा यांनी सांगितले की, आरोपी नीरज बिश्नोईने चौकशीदरम्यान अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. नीरजने कबूल केले की त्याला वयाच्या १५ व्या वर्षापासून हॅक करण्याची, वेबसाइट्स स्पूफ आणि शिकण्याची सवय होती.
आरोपी बिश्नोईने भारताव्यतिरिक्त पाकिस्तानातील शाळा आणि विद्यापीठांच्या विविध वेबसाइट्स हॅक केल्याचा दावाही केला आहे. नीरज बिश्नोई यांनी GIYU, जपान-निर्मित एका गेममधील पात्राचा वापरून विविध ट्विटर हँडल देखील तयार केले होते. त्याने GIYU शब्दाने खाते तयार केले होते, ज्याद्वारे त्याने तपास करणाऱ्या संस्थांना त्याला पकडण्याचे आव्हानही दिले होते.
‘बुली बाई अॅप’ प्रकरणात धक्कादायक वळण; १२ वी पास १८ वर्षांची मुलगी मुख्य आरोपी; पोलीसही चक्रावले
पोलीस कोठडीत, नीरज चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्याला GIYU म्हणायला सांगतो. त्याने हे नाव GIYU टोमिओका या जपानी कॉमिक पुस्तकातील काल्पनिक पात्रावरून घेतले आहे जो राक्षसांना मारतो. पोलिसांना तपासात असेही कळाले आहे की, बिश्नोईने गेल्या दोन वर्षात GIYU सारख्या नावाने पाच ट्विटर अकाउंट तयार केले होते, ज्याद्वारे तो वादग्रस्त अॅपवरुन सोशल मीडियावर महिलांविरोधात अश्लील कमेंट करत असे.
दरम्यान, बुली बाई अॅप प्रकरणातील मुख्य आरोपी नीरज बिश्नोई याला दिल्ली पोलिसांनी आसाममधून अटक केली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून बुलीबाई अॅपवर मुस्लिम महिलांचे फोटो अपलोड करून आक्षेपार्ह वक्तव्य करून द्वेष पसरवणारा मुख्य सूत्रधार नीरज बिश्नोई चर्चेत होता. यापूर्वी, बुली बाई अॅप प्रकरणातच, मुंबई पोलिसांनी बेंगळुरूमधून एक आणि उत्तराखंडमधून दोघांना अटक केली आहे.