एक्स्प्रेस वृत्त, चेन्नई

विविध राज्यांमध्ये करोनाचे रुग्ण वाढत असताना, ‘एनबी.१.८.१’ या कोविड-१९च्या नव्या उपप्रकाराचा किमान एक नमुना सापडला असल्याचे वृत्त ‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिले आहे. एप्रिलमध्ये या नमुन्याचे संकलन आणि निर्धारण करण्यात आले होते. तमिळनाडूमधील ‘कोविड-१९ जीनोम सिक्वेन्सिंग कन्सोर्टियम इन्साकॉग’ (आयएनएसएसीओजी) येथे हा नमुना सादर करण्यात आला आहे.

गेल्या काही आठवड्यांत सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये कोविड-१९ची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. सर्वात अलीकडील उपलब्ध माहितीनुसार, १८ मेपर्यंत २२ देशांमधून ‘एनबी.१.८.१’चे ५१८ नमुने सादर करण्यात आले आहेत. भारतातही करोनाचे रुग्ण सापडत असून देशात गेल्या दोन आठवड्यांमध्ये अनुक्रमित करण्यात आलेले बहुसंख्य ‘एसएआर-सीओव्ही-२’ नमुने हे ‘बीए.२’ आणि ‘जेएन.१’ उपप्रकार होते. उपलब्ध प्राथमिक माहितीनुसार, या रुग्णांमधील लक्षणे बहुमतांशी सौम्य असून ती गंभीर किंवा मृत्यूस कारणीभूत होणारी नाहीत.

जागतिक आरोग्य संघटनेने ‘एनबी.१.८.१’ हा उपप्रकार सध्या देखरेखीखाली असल्याचे जाहीर केले आहे. या उपप्रकाराचे गुणधर्म ‘एसएआर-सीओव्ही-२’ विषाणूच्या गुणधर्मांपेक्षा बरेचसे भिन्न आहेत. मात्र, त्याचे रूपांतर महासाथीत होऊ शकते का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सध्याच्या ‘एलपी ८.१’च्या तुलनेत याचे सहा आणि जेएन.१च्या तुलनेत आठ उत्परिवर्तन आहेत.

यापैकी काही उत्परिवर्तनांमुळे त्यांचे संक्रमण वाढून ते निकामी होण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यामुळे सध्या कोविड-१९विरुद्ध असलेल्या प्रतिकारशक्तीचा त्यांच्यावर कमी परिणाम होण्याची भीती आहे.

रुग्णसंख्या १९वर

ठाणे महापालिका क्षेत्रात आणखी ९ करोना रुग्ण आढळून आले असून यामुळे रुग्ण संख्या १९ इतकी झाली आहे. एकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर, एकाचा मृत्यू झाला आहे. उर्वरित १७ जण गृहविलगीकरणात राहून उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली.

एनबी.१.८.१ हा पूर्वीच्या उपप्रकारांपेक्षा अधिक गंभीर आजारास कारणीभूत होण्याचे लक्षण आतापर्यंत आढळलेले नाही. मात्र, तो मानवी पेशींना अधिक जलद चिकटतो, त्यामुळे तो अधिक संसर्गजन्य होतो. त्यामुळे त्याचे संक्रमण अधिक सहज होते. – जतिन आहुजा, आरोग्यतज्ज्ञ, अपोलो रुग्णालय, दिल्ली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.