Covid-19 : संपूर्ण जगात २०२० मध्ये कोरोनाने कहर केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा आशिया खंडात कोरोनाच्या लाटेची भिती व्यक्त केली जात आहे. याचं कारण म्हणजे हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोना पुन्हा एकदा पसरत असल्याचं समोर आलं आहे. हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले असून कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर हाँगकाँग आणि सिंगापूरमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी दाट लोकवस्ती असलेल्या ठिकाणी कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याचा इशारा दिला आहे. या संदर्भातील वृत्त ब्लूमबर्गच्या हवाल्याने हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे. वृत्तानुसार, हाँगकाँग आणि सिंगापूरमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी दोन्ही प्रदेशांमध्ये कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत वाढ नोंदवली आहे.

हाँगकाँगच्या सेंटर फॉर हेल्थ प्रोटेक्शनच्या कम्युनिकेबल डिसीज ब्रँचचे प्रमुख अल्बर्ट औ यांनी या आठवड्यात स्थानिक माध्यमांना संबोधित करत असताना विषाणूची गति जास्त असल्याचं म्हटलं आहे. तसेच हाँगकाँगमध्ये कोविड पॉझिटिव्ह आढळलेल्या नमुन्यांची संख्या वाढली असल्याचं वृत्तात म्हटलं आहे. आकडेवारीनुसार, ३ मे रोजीच्या आठवड्यात कोविडमुळे झालेल्या मृत्यूंसह गंभीर प्रकरणे ३१ वर पोहोचले आहेत. ही आकडेवारी गेल्या वर्षभरातील सर्वात जास्त आहे.

सिंगापूरमध्येही अलर्ट

दरम्यान, हाँगकाँगमधील कोविडच्या रुग्णांची संख्या एवढी जास्त नसली तरी हा विषाणू वेगाने पसरत असल्याचं समोर आलं आहे. सिंगापूरमध्येही अलर्ट देण्यात आला आहे. त्यांनी जवळजवळ एका वर्षात कोविडच्या रुग्णांची आकडेवारीची माहिती दिली. त्यामध्ये चिंताजनक संख्या समोर आली. ३ मे रोजीच्या आठवड्यात अंदाजे कोविड प्रकरणांची संख्या मागील आठवड्याच्या तुलनेत २८ टक्के वाढली आहेत.

सिंगापूर आरोग्य मंत्रालयाच्या मते कोविडच्या रुग्णांमध्ये वाढ ही लोकांच्या रोगप्रतिकारक शक्तीत घट झाल्यामुळे होऊ शकते. मात्र, सध्याचे प्रकार साथीच्या काळात दिसलेल्या प्रकारांपेक्षा जास्त गंभीर किंवा पसरणारे असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. दरम्यान, आशिया खंडातील दोन सर्वात महत्वाच्या देशात हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोविडच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने लोकांना विशेषतः जास्त धोका असलेल्यांना बूस्टर डोस घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.