तब्बल पाच आठवडय़ांच्या साखळी फेरीच्या थरारानंतर आता विश्वचषक स्पर्धा महत्त्वपूर्ण टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड या चार संघांनी अनेक अडथळ्यांवर मात करत उपांत्य फेरीत मजल मारली आहे. त्यापैकी मंगळवारी मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदानावर रंगणाऱ्या पहिल्या उपांत्य लढतीत भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ यंदाच्या विश्वचषकात पहिल्यांदाच एकमेकांशी भिडणार आहेत. भारताची आघाडीची फलंदाजीची फळी विरुद्ध न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाजीचा मारा असा हा सामना रंगणार आहे.
दोन वेळा विश्वविजेत्या ठरलेल्या भारताने साखळी फेरीवर पूर्णपणे वर्चस्व गाजवत नऊपैकी सात सामने जिंकून गुणतालिकेत अव्वलस्थानी धडक मारली. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला होता. चौथ्या क्रमांकाचा अनुत्तरित तिढा आणि खेळाडूंच्या दुखापती यावर मात करत भारतीय संघाने मोठी मजल मारली आहे. मात्र आता भारतासमोर काहीशा अस्थिर असलेल्या न्यूझीलंडचे आव्हान असेल.
२०१५च्या विश्वचषकाची अंतिम फेरी गाठणाऱ्या न्यूझीलंडनेही धडाक्यात सुरुवात केली होती. मात्र अखेरच्या टप्प्यात निराशाजनक कामगिरी केल्यामुळे त्यांना जेमतेम उपांत्य फेरी गाठता आली.
रोहित शर्मा (६४७ धावा), लोकेश राहुल (३६० धावा) आणि कर्णधार विराट कोहली (४४२ धावा) हे भारताचे अव्वल तीन फलंदाज तुफान बहरात असून या तिघांनी यंदाच्या विश्वचषकात मिळून १४४९ धावा उभारल्या आहेत. फलंदाजीच्या बाबतीत न्यूझीलंडपेक्षा भारताचे पारडे जड मानले जात आहे. न्यूझीलंडसाठी कर्णधार केन विल्यम्सन (४८१ धावा) तारणहार ठरला असून त्याखालोखाल रॉस टेलरने २६१ धावांचे योगदान दिले आहे.
रोहितला विक्रमाची संधी
फलंदाजीत रोहितचा झंझावात रोखणे अवघड असतानाच, त्याने एकाच विश्वचषकात पाच शतके झळकावण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. त्याचबरोबर सचिन तेंडुलकरच्या विश्वचषक स्पर्धेतील सहा शतकांच्या विक्रमाशी बरोबरी साधली. आपल्या कारकीर्दीतील सर्वोत्तम बहरात असलेला रोहित प्रतिस्पर्धी गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. ट्रेंट बोल्ट, मॅट हेन्री आणि लॉकी फग्र्युसन या किवींच्या वेगवान गोलंदाजांचा सामना करताना रोहित आणि राहुल यांनी आपला बळी न गमावता सावध सुरुवात करून डावाची उभारणी करण्याची अपेक्षा बाळगली जात आहे.
धोनीबाबत प्रचंड आदर – कोहली
दोन विश्वचषक जिंकणारा कर्णधार ते आता खेळाडू असा स्थित्यंतराचा प्रवास करणाऱ्या महेंद्रसिंह धोनीकडे अनुभवाचा खजिना आहे. धोनीने निपुण सल्लागाराची भूमिका नेहमीच बजावली आहे. त्यामुळे एक खेळाडू म्हणून मला धोनीबाबत प्रचंड आदर आहे, अशा शब्दांत भारताचा कर्णधार विराट कोहलीने माजी कर्णधाराची स्तुती केली. कोहली म्हणाला, ‘‘दशकभरापासून भारतीय संघाचे नेतृत्व सांभाळल्यानंतर आता फक्त खेळाडू म्हणून खेळताना धोनी आपले म्हणणे कुणावरही लादत नाही. तो आपल्याला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देतो. धोनीकडून मिळणारे मोलाचे सल्ले भारताच्या यशात महत्त्वपूर्ण ठरत आहेत. त्यामुळेच मला कर्णधार म्हणून भूमिका निभावताना मजा येत आहे. मी धोनीकडून कोणत्याही बाबतीत सल्ले मागत असतो. तो नि:संशयपणे मला मदत करत असतो.’’
मधल्या फळीची चिंता
* भारताला आतापर्यंत फलंदाजीत रोहित, राहुल आणि कोहली यांनी तारले असून मधल्या फळीला अद्यापही उपयुक्त योगदान देता आले नाही.
* महेंद्रसिंह धोनीला आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करता न आल्यामुळे त्याच्यावर चौफेर टीका होत आहे. त्याचबरोबर अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंडय़ा यालाही फलंदाजीत प्रभाव पाडता आलेला नाही.
* केदार जाधव आणि विजय शंकर हे सपशेल अपयशी ठरले आहेत. संधी मिळूनही दिनेश कार्तिकला छाप पाडता आलेली नव्हती. त्यामुळे भारताला मधल्या फळीची समस्या लवकरात लवकर सोडवावी लागणार आहे.
जडेजाचे स्थान कायम?
* जसप्रीत बुमराने आतापर्यंत १७ बळी मिळवले असून मोहम्मद शमीनेही १४ बळी टिपत त्याला चांगली साथ दिली आहे.
* वेगवान गोलंदाजीची जबाबदारी या दोघांवरच असल्यामुळे भुवनेश्वर कुमारला उपांत्य सामन्यात संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.
* रवींद्र जडेजाने श्रीलंकेविरुद्धच्या गेल्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती. त्यामुळे त्याचे अंतिम ११ जणांमधील स्थान कायम राहणार असून कुलदीप यादव आणि यजुर्वेद्र चहल यांच्यापैकी एकाची निवड केली जाणार आहे.
न्यूझीलंडला फलंदाजीची चिंता
केन विल्यम्सन वगळता न्यूझीलंडचा एकही फलंदाज लयीत नाही. सलामीवीर मार्टिन गप्तिल (१६६ धावा) आणि कॉलिन मुनरो (१२५ धावा) हे अपयशी ठरले आहेत. रॉस टेलर याने बऱ्यापैकी योगदान दिले असले तरी न्यूझीलंडची फलंदाजीतील भिस्त विल्यम्सनवरच आहे. इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात न्यूझीलंडची फलंदाजी पुरती कोलमडली होती. हेन्री निकोल्स, टॉम लॅथम आणि जिमी नीशाम यांच्याकडून न्यूझीलंडला भरीव योगदानाची अपेक्षा आहे.
गोलंदाजांवर भिस्त
ट्रेंट बोल्ट, लॉकी फग्र्युसन, मॅट हेन्री आणि जिमी नीशाम यांनी प्रतिस्पर्धी फलंदाजांवर बऱ्यापैकी वर्चस्व गाजवले आहे. सुरुवातीच्या षटकांमध्ये बोल्ट न्यूझीलंडला बळी मिळवून देत आपल्यावरील जबाबदारी चोखपणे पार पाडत आहे. त्याचबरोबर फग्र्युसन मधल्या षटकांमध्ये यशस्वी ठरत आहे. हेन्री आणि नीशाम यांनीही गोलंदाजीत चमक दाखवल्यामुळे न्यूझीलंडला उपांत्य फेरीपर्यंत मजल मारता आली आहे. त्यामुळे भारताच्या भक्कम फलंदाजीसमोर आता गोलंदाजांची कामगिरी कशी होते, यावर न्यूझीलंडचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
उपांत्य फेरी-१
भारत वि. न्यूझीलंड
स्थळ : इमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राऊंड, मँचेस्टर
सामन्याची वेळ : दुपारी ३ वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स २,
स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १, स्टार स्पोर्ट्स हिंदी १
संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, हार्दिक पंडय़ा, कुलदीप यादव, यजुर्वेद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, मयांक अगरवाल, रवींद्र जडेजा, ऋषभ पंत.
न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), रॉस टेलर, मार्टिन गप्तिल, कॉलिन मन्रो, टॉम लॅथम (यष्टिरक्षक), कॉलिन डी’ग्रँडहोम, जेम्स निशाम, मॅट हेन्री, ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी, मिचेल सँटनर, इश सोधी, टॉम ब्लंडेल, लॉकी फग्र्युसन, हेन्री निकोल्स.
आमनेसामने
एकदिवसीय सामने : १०७, भारत : ५५, न्यूझीलंड : ४५, टाय / रद्द : १/६
विश्वचषकात सामने : ८, भारत : ३,
न्यूझीलंड : ४, टाय / रद्द : ०/१
खेळपट्टीचा अंदाज
सामन्यादरम्यान पावसाची दाट शक्यता आहे. जर राखीव दिवशी सामना खेळवण्याची वेळ आल्यास, त्यादिवशीही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल असली तरी फिरकीपटूंनाही योग्य मदत मिळेल.
