Newborn Baby Found Under Rock In Madhya Pradesh Forest: मध्य प्रदेशच्या चिमद्वारा येथील जंगलात एका खडकाखाली ३ दिवसांचे बाळ आढळले आहे. चौथ्या मुलाच्या जन्मानंतर सरकारी नोकरी जाण्याच्या भीतीने, प्राथमिक शिक्षकाने नवजात बाळाला जंगलात सोडून दिले होते.
रविवारी रात्री नंदनवाडी गावाजवळील जंगलात काही गावकऱ्यांना खडकांजवळ नवजात बाळ दिसले तेव्हा ही घटना उघडकीस आली. यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बाळाला वाचवले. बाळाला प्राथमिक उपचारांसाठी स्थानिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले आणि नंतर पुढील उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
बबलू दंडोलिया आणि राजकुमारी दंडोलिया असे आरोपींची नावे आहेत. बबलू दंडोलिया २००९ पासून सरकारी प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. त्यांनी आपल्या कृत्याची कबुली देताना सांगितले की, चौथ्या मुलामुळे त्यांना निलंबित केले जाईल किंवा नोकरीवरून काढून टाकले जाईल अशी भीती होती आणि म्हणूनच त्यांनी हे कृत्य केले.
“नोकरी जाण्याच्या भीतीने वडिलांनी बाळाला खडकाखाली सोडल्याची कबुली दिली. त्याला ४, ६ आणि ८ वर्षांची आणखी तीन मुले आहेत. दोन्ही पालकांना अटक करण्यात आली आहे”, असे बटकाखापा पोलीस ठाण्याचे प्रमुख अनिल राठोड यांनी सांगितले. याबाबत इंडिया टुडेने वृत्त दिले आहे
या बाळावर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचा पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे असून कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
“त्यांनी आम्हाला सांगितले की त्यांनी तिसरे मूल रेकॉर्डमधून लपवून ठेवले आहे, परंतु चौथ्या मुलाची नोंदणी झाल्यास नोकरी जाईल अशी भीती त्यांना होती”, असे धानोरा पोलीस ठाण्याचे प्रभारी लखनलाल अहिरवार यांनी सांगितले. याबाबत टाईम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे.