Pets Trigger Divorce Between Bhopal couple: हल्ली घटस्फोटाचं प्रमाण वाढले आहे, असं म्हटलं जातं. मोबाइल, बदललेली जीवनशैली, विभक्त राहण्याचा अट्टाहास, करीअर, आवडीनिवडीमधील फरक अशा एक ना अनेक कारणांमुळं घटस्फोट होत असतात. पण मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये घटस्फोटाचं विचित्र प्रकरण समोर आलं आहे. भोपाळच्या कुटुंब न्यायालयात अभियंता असलेल्या पती-पत्नीनं घटस्फोटाचा अर्ज केला आहे. विशेष म्हणजे प्राणी मित्र असलेल्या या जोडप्यानं प्राण्यांसाठी वेगळं होण्याचा निर्णय घेतल्यामुळं सर्वत्र या प्रकरणाची चर्चा होत आहे.
प्राणी वाचवण्यासाठी आयोजित एका निदर्शनात सदर जोडप्याची पहिल्यांदा ओळख झाली आणि ते मित्र बनले. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर त्यांनी डिसेंबर २०२४ मध्ये लग्न केले. पत्नी उत्तर प्रदेशहून पतीच्या भोपाळमधील घरी राहायला आली. तिच्याबरोबर तिची पाळीव मांजरही सासरी आली. तर पतीकडे आधीपासूनच पाळीव कुत्रा, ससा आणि फिश टँक होता.
लग्नानंतर काही दिवस सुखात गेले. दोघेही आपापल्या पाळीव प्राण्यांची काळजी घेत होते. पती-पत्नीचं प्रेम जुळलं असलं तरी त्यांचे पाळीव प्राणी मात्र एकमेकांशी जुळवून घ्यायला तयार नव्हते. त्यांच्यातील संघर्षाचा परिणाम जोडप्याच्या नात्यावर होऊ लागला. अखेर पती-पत्नीनं भोपाळ कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठीचा अर्ज दाखल केला.
नेमके प्रकरण काय?
पत्नीचा आरोप आहे की, पतीचा कुत्रा तिच्या मांजरीवर भुंकत राहतो. त्यामुळं ती भेदरून गेली आहे. कधी कधी ती इतकी घाबरलेली असते की, जेवणही करत नाही. तर पतीचा आरोप आहे की, पत्नीची मांजर आगाऊ आहे. ती फिशटँककडे टोळे वटारून पाहत असते. त्यातील माशांना खाण्याचा तिचा प्रयत्न असतो. तसेच ती दिवशभर घरात म्याऊं-म्याऊं करत राहते.
पाळीव प्राण्यांमुळं निर्माण झालेला संघर्ष अखेर कुटुंब न्यायालयात पोहोचला. मात्र पालकांनी दिलेल्या सुचनेनुसार जोडप्याने कुटुंब सल्लागार केंद्रातून सल्ला घेण्याचा पर्यायही स्वीकारला आहे. कुटुंब समुपदेशक शैल अवस्थी जोडप्यातील वाद सोडवून त्यांना पुन्हा एकत्र राहण्यास सांगत आहेत. पहिल्या बैठकीत पतीनं सांगितलं की, पत्नीच्या मांजरीमुळं तो आपल्या पाळीव प्राण्यांना घेऊन वेगळा राहू इच्छितो. तर पत्नीनं सांगितलं की, आपल्या मांजरीला ती उदास पाहू शकत नाही.
आता दसऱ्या नंतर समुपदेशकाबरोबर दुसरी बैठक होणार आहे. या बैठकीत पुन्हा एकदा पती-पत्नीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जाईल. शैल अवस्थी यांनी सांगितले की, लग्नाला केवळ आठच महिने झाले आहेत. मात्र एकमेकांच्या पाळीव प्राण्यांमुळे जोडप्याने गैरसमज निर्माण केले आहेत. कुटुंब एकत्र राहावं म्हणून त्यांची समजूत काढली जात आहे.