नवी दिल्ली : युवा शक्तीमध्ये बदल घडविण्याची ताकद आहे. विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत आगामी २५ वर्षे महत्त्वपूर्ण ठरणार असून युवा पिढीच्या जोरावरच भारत आगामी काळात मोठी झेप घेईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले.

‘विकसित भारत  @२०४७ : युवकांचा आवाज’ या अभियानाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील राज्यपाल, अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू, सार्वजनिक, खासगी आणि अभिमत विद्यापीठांचे कुलगुरू, कुलसचिव यांच्याशी सोमवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. ‘विकसित भारत  @२०४७ : तरुणांचा आवाज’ या पोर्टलचे अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते झाले. तरुणांनी विकसित भारताला योगदान देण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करण्याच्या उद्देशाने या पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> ‘अनुच्छेद ३७०’ रद्दच, मात्र निवडणुका घ्या! सर्वोच्च न्यायालयाचा जम्मू-काश्मीरबाबत ऐतिहासिक निर्णय

‘‘आमच्यासमोर अमृतकालची २५ वर्षे आहेत. आम्हाला २४ तास काम करायचे आहे. देशाचे नेतृत्व करतील आणि राष्ट्रहिताला प्राधान्य देतील अशा प्रकारे तरुण पिढीला तयार करायचे आहे. पुढील २५ वर्षे महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील तरुणांच्या करिअरसाठी निर्णायक ठरणार आहेत. हे तरुणच भविष्यात नवीन समाज निर्माण करणार आहेत. भविष्यात नवीन समाज, विकसित भारत कसा असावा हे ठरवण्याचा अधिकार त्यांनाच आहे. विकसित भारताच्या कृती आराखडयात देशातील प्रत्येक तरुणाने सहभागी झाले पाहिजे, अशी सरकारची भूमिका आहे,’’ असे पंतप्रधान म्हणाले. 

महाराष्ट्रात राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली विकसित भारताच्या संकल्पनांवर चर्चा करण्यासाठी राजभवनमधील दरबार हॉल येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू, खासगी विद्यापीठ, अभिमत विद्यापीठांचे कुलगुरू, प्र-कुलगुरू, शैक्षणिक संस्थाचे प्रमुख उपस्थित होते. 

राज्यपाल बैस म्हणाले, की समाज आणि राष्ट्रासाठी विद्यापीठ, उच्च शिक्षण संस्थांनी लोकाभिमुख वार्षिक महोत्सव आयोजित करावे. शिक्षण प्रणालीमध्ये नाविन्यपूर्ण कल्पना, नवनवीन उपक्रम यांचा वापर करणे गरजेचे आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र आदर्श ठरावा. 

‘सर्वोत्कृष्ट १० सूचनांचा विशेष गौरव’

‘विकसित भारत  @२०४७ : युवकांचा आवाज’ या अभियानासाठी प्रत्येकाने आपल्या विचारांच्या कक्षा ओलांडून परिघाबाहेरील वेगळा विचार करावा. विकसित भारतासाठी उपयुक्त सूचना पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पहिल्या दहा चांगल्या सूचना मांडणाऱ्या व्यक्तींना विशेष सन्मानित करण्यात येईल, असे नरेंद्र मोदी यांनी यावेळी जाहीर केले.