“सरकारचं पुढील लक्ष्य माध्यमं असणार आहेत”, असा इशारा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी दिला आहे.त्याचसोबत, स्वतःला वाचवण्यासाठी माध्यमांनी केंद्र सरकारच्या ३ कृषी कायद्यांविरोधातील आमच्या आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन देखील राकेश टिकैत यांनी केलं आहे. “प्रत्येकानेच आमच्या या आंदोलनात सामील व्हावं. सरकारचं पुढील टार्गेट माध्यमं असतील. तुम्हाला वाचवायचं असेल तर आमच्यात सामील व्हा. अन्यथा तुम्हालाही त्रास सहन करावा लागेल”, असं राकेश टिकैत छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये बोलताना म्हणाले.

राकेश टिकैत हे गरियाबंद जिल्ह्यातील राजिम येथे ‘किसान महापंचायती’ला उपस्थित राहणार आहेत. त्यापूर्वी याबाबत बोलताना ते म्हणाले की, सर्वात मोठी समस्या पिकांच्या आणि भाज्यांच्या किमान आधारभूत किमतींची आहे. “आम्ही (छत्तीसगडमधील) शेतकऱ्यांचे प्रश्न मांडू. सर्वात मोठी समस्या देशातील एमएसपीची आहे. आम्ही हा मुद्दा उपस्थित करू. राज्यातील भाजीपाला उत्पादकांना अधिक फायदा कसा मिळू शकतो आणि त्यांच्यासाठी कोणती धोरणं बनविणं आवश्यक आहे, याबद्दल आम्ही बोलू.”

शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) कायदा २०२०, शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार कायदा २०२०, अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) कायदा २०२० असे तीन नवे कृषी कायदे गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये संसदेने मंजूर केले आहेत. मात्र, काही प्रमुख आक्षेप या कायद्यांना शेतकऱ्यांचा कडाडून विरोध आहे. गेलं वर्षभर याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचं केंद्र सरकार आणि या ३ कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरु आहे. मात्र, अद्यापही कोणताही तोडगा न निघाल्याने आणि दरम्यानच्या वर्षभरात घडलेल्या अनेक हिंसक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता मुद्दा वारंवार चिघळतो आहे.