nia investigation into mangalore autorickshaw blast zws 70 | Loksatta

‘एनआयए’कडून मंगळूरु स्फोटाचा तपास सुरू

कर्नाटकचे पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांच्या सूचनेनुसार हे प्रकरण ‘एनआयए’कडे सोपवण्यात आले आहे

‘एनआयए’कडून मंगळूरु स्फोटाचा तपास सुरू

मंगळूरु : राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) तीन पथकांनी मंगळूरु येथे १९ नोव्हेंबर रोजी रिक्षात झालेल्या स्फोटाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी सांगितले, की या स्फोटाचा दहशतवादी कारवायांशी संबंध असल्याने हा तपास ‘एनआयए’कडे सोपवण्याचा निर्णय झाला. त्यानुसार या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे ‘एनआयए’कडे सोपवली आहेत. ‘एनआयए’ने गुरुवारी अधिकृतरीत्या तपास सुरू केला आहे.

कर्नाटकचे पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांच्या सूचनेनुसार हे प्रकरण ‘एनआयए’कडे सोपवण्यात आले आहे, असे शहर पोलीस आयुक्त एन. शशीकुमार यांनी सांगितले. या प्रकरणातील प्रमुख आरोपी व  संशयित  दहशतवादी मोहम्मद शरीकची  पोलिसांनी याआधी  चौकशी केली होती. शहराच्या बाहेरील नागोरी येथे रिक्षात कुकर बॉम्बचा स्फोट झाला तेव्हा झालेल्या स्फोटात शरीक ४० टक्के भाजला होता. त्याच्या बँक खात्यात विदेशातून पैसे आल्याचे समोर आल्याचे  पोलीस सूत्रांनी सांगितले. त्याने ‘डार्क वेब’द्वारे खाते उघडले होते. विदेशी चलनाचे भारतीय चलनात रुपांतर करून तो वेगवेगळय़ा खात्यांमध्ये ते जमा करत असे.

त्याने म्हैसूरमधील अनेक जणांच्या बँक खात्यांमध्ये रक्कम जमा केल्याचीही माहिती पोलिसांना मिळाली आहे.

मंदिरांच्या सुरक्षेत वाढ

दरम्यान, उडुपी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अक्षय हाके यांनी आरोपी शरीकने ऑक्टोबरमध्ये उडुपी येथील श्रीकृष्ण मठात भेट दिल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. त्यांनी उडुपी येथे पत्रकारांना सांगितले की पोलिसांना त्याच्या चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीनुसार मंगळूरु पोलिसांनी उडुपी येथे येऊन चौकशी केली आहे. मंगळूरु येथील घटनेनंतर उडुपी जिल्ह्यातील अनेक मंदिरांना पुरवल्या जाणाऱ्या सुरक्षेबाबत त्यांनी उपायुक्तांशी चर्चा केली आहे. मंदिरातील सुरक्षा व्यवस्थेची वेळोवेळी तपासणीसाठी जिल्हास्तरीय समन्वय समिती स्थापन केली जाईल, असेही हाके यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 03:49 IST
Next Story
‘जी २०’ अध्यक्षपदाचा प्रचार नाटकी; काँग्रेसची टीका